satara : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र सरकारची तत्परता

मदतकार्यासाठी विशेष टीम पाठवण्याची पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा
विजय लाड
कोयनानगर – उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले असून महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तेथे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलली असून पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष मदत टीम उत्तराखंडकडे पाठवण्याची घोषणा केली आहे.
पर्यटनमंत्री देसाई म्हणाले की, “पर्यटकांची अडचण लक्षात घेता आम्ही उत्तराखंड प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहोत. आमच्या टीमने संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदत कार्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.”
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही परिस्थितीचा आढावा घेत अडकलेल्या पर्यटकांशी थेट संवाद साधला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, पर्यटन विभाग आणि NDRF (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) यांच्या संयुक्त सहकार्याने मदत कार्य राबवले जात आहे.
राज्य शासनाच्या या तत्परतेमुळे अडकलेल्या पर्यटकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून मदतकार्य लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





