सातारा – यंदाचा ‘गणेशोत्सव’ साजरा करूया ‘उल्लास’च्या संगे !

सातारा – सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात १ कोटी ६३ लक्ष एवढे असाक्षर आढळून आले असून त्यांना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि उल्लास योजनेच्या प्रचार प्रसारासाठी राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ.महेश पालकर यांनी गणेशोत्सव व नवरात्रा सारख्या सार्वजनिक उत्सवांचा उपयोग करून घेण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. दरम्यान एक ते आठ सप्टेंबर या कालावधीत साक्षरता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राज्यभर घेण्यात येत असून दि. ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिनापासून साक्षरता वर्ग सुरू करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी राज्याला १२ लाख ४० हजार इतक्या असाक्षरांना साक्षर करण्याची उद्दिष्ट होते. त्यापैकी ४ लक्ष ५९ हजार इतके असाक्षर परीक्षेला बसले, पैकी ४ लाख २५ हजार उत्तीर्ण झाले. केंद्र शासनाने राज्याला सन २०२४-२५ साठी नवीन उद्दिष्ट न देता मागील दोन वर्षातील उर्वरित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्देश दिले आहेत. या वर्षात महाराष्ट्रातून सुमारे ८ लक्ष इतक्या असाक्षरांची साक्षरता परीक्षेसाठी नोंदणी अपेक्षित आहे. त्यातच गतवर्षी केंद्र शासनाने राज्यात सर्वाधिक असाक्षर असलेल्या पुणे व ठाणे जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्याबाबत राज्य शासनास कळवले आहे. राज्यस्तरावरून ही योजना राबविणाऱ्या योजना शिक्षण संचालनालयाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ केला आहे. आषाढी वारीत दोन्ही मोठ्या पालखी सोहळ्यांत राबविलेल्या ‘वारी साक्षरतेची’ या उपक्रमास मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर गणेशोत्सव व नवरात्र उत्सव या सारख्या सार्वजनिक उत्सवांकडे डॉ. महेश पालकर यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
राज्य योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर अधिक माहिती देताना म्हणाले ,८ सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिवस गणेशोत्सवाच्या दरम्यान येत आहे. राज्यभर साजऱ्या होणाऱ्या दोन्ही उत्सवामध्ये उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार प्रसार मंडळांमार्फत करणे शक्य आहे. गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळांना पुणे व मुंबई यांच्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त यंत्रणेमार्फत मंडळांना तशा सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळाना चालू वर्षी साक्षरता या थीमवर देखाव्यासह उपक्रम घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
उल्लास कार्यक्रमाच्या जिल्हा नियामक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत , मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह शिक्षण विभागातील यंत्रणांना आवश्यक निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. या दोन्ही उत्सवांमध्ये मंडळांमार्फत ‘उल्लास’च्या प्रचारासाठी निर्देश दिले आहेत.जिल्हा, तालुका यासह सर्व स्तरावर होणाऱ्या गणेशोत्सव नवरात्र उत्सव मंडळाच्या पूर्वतयारी बैठकांमध्ये याबाबतचे महत्त्व विशद करण्याबाबत पोलीस प्रशासनासह सर्व प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
उत्सव काळात उल्लास कार्यक्रमाचे बॅनर लावणे, साक्षरता कार्यक्रमावर आधारित जिवंत व अन्य देखावे, रांगोळी चित्रकला, गीत गायन यासारख्या स्पर्धा, नवसाक्षरांच्या मुलाखती व सत्कार, मंडळांनी आपल्या कुवतीप्रमाणे दहा, पन्नास, शंभर अशा संख्येत असाक्षरांना वर्षभरात साक्षर करणे, त्यासाठी मंडळ कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करणे असे उपक्रम सुचवण्यात आले आहेत. ‘यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया ‘उल्लास’च्या संगे!’ अशी टॅगलाईन देऊनही राज्य कार्यालयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्रौढ शिक्षणाऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ अशी संज्ञा या योजनेत उपयोगात आणली असून उद्दिष्ट पूर्तीसाठी शालेय शिक्षण विभागासह इतर विभागांच्या सहकार्याची, कृतीयुक्त सहभागाची आवश्यकता आहे. सार्वजनिक उत्सवांमध्ये याबाबत आणखी गतीने जनजागृती करण्यात येणार आहे.
-डॉ महेश पालकर, सदस्य सचिव राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण.





