सातारा । कराड, मलकापूरच्या पाणी समस्येची उदयनराजेंकडून पाहणी

सातारा – कराड आणि मलकापूर येथे निर्माण झालेल्या पाणीबाणीची गंभीर दखल घेऊन, खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड शहरात शनिवारी तातडीने पाहणी केली. त्यानंतर सातार्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमवेत बैठक घेऊन, या प्रश्नावर तोडगा काढण्याविषयी चर्चा केली. कराड, मलकापूर आणि सैदापूर या भागांसाठी एकत्रित पाणीपुरवठा योजना लागू केल्यास, तेथील पाणीप्रश्न कायमचा निकाली निघेल. त्यासाठी उपाययोजना करू, असे आश्वासन डुडी यांनी दिले.
या बैठकीस कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी सभापती हनुमंतराव पवार, ज्येष्ठ नेते विनायक पावसकर, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, बाळासाहेब यादव, किरण पाटील, ओंकार मुळे, निशांत ढेकळे, विनोद भोसले, विजय यादव, कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी डी. पी. जैन उपस्थित होते.
कराड, मलकापूर आणि सैदापूरला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या कोयना नदीची पाणीपातळी वाढल्याने वाहून गेल्या आहेत. राजेंद्रसिंह यादव यांनी ही माहिती खासदार उदयनराजे यांना दिली. त्यामुळे उदयनराजे यांनी शनिवारी तातडीने कराडचा दौरा करून, या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या दालनात बैठक घेतली.
डुडी म्हणाले, कराडचा पाणीप्रश्न तात्पुरता सोडवण्यासाठी 120 अश्वशक्तीचा पंप नदीवर बसवण्यात आला आहे. त्याद्वारे पाणी उपसून कराडला पुरवले जाणार आहे. दुसर्या टप्प्यात शंभर अश्वशक्तीचा आणखी एक पंप बसवण्यात येईल. ज्या ठिकाणी अधिक अडचण आहे, तेथे टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. कोयना पुलावरून स्वतंत्र जलवाहिनी कशी नेता येईल, याबाबतचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडून मागवण्यात आला आहे. मूळच्या पाणीपुरवठा योजनेचे पाइप कुठे तुटले आहेत, याची पाहणी सुरू आहे. ते दुरुस्त करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
70 अश्वशक्तीचा उपसा पंप स्टँड बाय ठेवण्याच्या सूचना कराड पालिकेला देण्यात आल्या आहेत. कराड, मलकापूर आणि सैदापूरसाठी एकत्रित स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा आराखडा बनवून, नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन डुडी यांनी दिले. कराड शहराला स्वच्छ व कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा. तांत्रिक अडचणी उद्भवू नयेत, याकरिता तातडीच्या उपायोजना केल्या जाव्यात, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.





