उदयनराजे उमेदवार ठरल्यास आमची भूमिका पक्षावेगळी नाही

सातारा – सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा कोणत्याही घटक पक्षाचा उमेदवार अंतिम झाल्यास त्याला मताधिक्य देण्याची जबाबदारी आमची आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जरी ठरली तरी आमची भूमिका पक्षाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत राहील. 2019 च्या निवडणुकीतही आम्ही उदयनराजे यांना मताधिक्य दिले होते. आमचा विरोध हा स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भातही त्यांनी वेगळी भूमिका मांडली होती. पक्षाच्या ध्येय धोरणानुसारच आमची भूमिका असेल असे स्पष्ट विधान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कास जलवाहिनी अमृत योजनेच्या उद्घाटन समारंभ नंतर सुरुची येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 103 कोटी रुपये योजनेच्या कास जलवाहिनी अमृत योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर येथून ऑनलाईन हिरवा कंदील दिला त्याबद्दल त्यांनी सातारकरांच्या वतीने त्यांचे आभार मानल.
ते म्हणाले, या अमृत योजनेमध्ये 34 कोटी रुपये वाटा राज्य शासनाचा 52 कोटी रुपये केंद्र शासनाचा व 16 कोटी रुपये नगरपालिकेचा वाटा आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी असताना कास धरणाच्या उंचीचा प्रस्ताव आम्हीच मंजूर करून घेतला. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित दादा यांच्याकडून या योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता करून घेतली यामुळे सातारा शहर आणि उपनगरांचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यासाठी उरमोडी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी केली होती या संदर्भात बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आंधळी धरणातून सोडले जाणारे पाणी हे आरक्षित आहे. हे पाणी उरमोडी धरणातून सोडले जाताना सातारा तालुक्यातील गावांची आणि सातारा शहराची पाणीटंचाई होणार नाही, अशीच आमची भूमिका आहे. टंचाईग्रस्त परिस्थिती कुठेही टंचाई जाणवणार नाही या पद्धतीनेच पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन केले जाई.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा लोकसभा निवडणुकीत महायुती मधील शिंदे गट असो राष्ट्रवादी अजित पवार गट असो महायुतीचा जो उमेदवार अंतिम ठरेल त्याला मताधिक्य देण्याची जबाबदारी आमची आहे . जर उदयनराजे उमेदवार ठरले तर, असा प्रश्न केला असता आमदार शिवेंद्रसिंह राजे म्हणाले 2019 च्या निवडणुकीतही आम्ही त्यांना मताधिक्य दिलेच होते त्या संदर्भात आमची पक्षाशी भूमिका सुसंगत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये आमची भूमिका वेगळी आहे तसेच बाजार समितीच्या निवडणुकीतही त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती सातारा विकास आघाडीने दिरंगाई केल्यामुळेच कासची पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यास विलंब झाला असे ते म्हणाले





