Satara : दैनंदिनीच्या पानापानांत शिवछत्रपतींचा इतिहास

सातारा : दैनंदिनीच्या पानापानांत शिवछत्रपतींचा इतिहास उलगडण्याची किमया संस्कार भारतीने केली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षा निमित्ताने उपलब्ध करुन दिलेली ही ‘श्रीमानयोगी’ दैनंदिनी घराघरांमध्ये संग्राह्य असावी, अशीच झाली आहे.
कला व साहित्य क्षेत्रात कार्यरत असणारी संस्कार भारती ही अखिल भारतीय संस्था सातत्याने नवीन काही तरी करत असते. संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताच्यावतीने २००८ पासून प्रतिवर्षी संग्राह्य व नाविन्यपूर्ण विषयावरील दैनंदिनी म्हणजेच डायरी प्रकाशित केली जाते. यावर्षी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षा निमित्त ‘श्रीमंतयोगी’ ही विशेष दैनंदिनी संस्कार भारतीने उपलब्ध करून दिली आहे. पुण्यात चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते प्रवीण तरडे यांच्या हस्ते १५ डिसेंबर २०२४ रोजी या दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. दि. ६ जून १६७४ रोजी राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे झाली. मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. वं. देगलूरकर व इतिहासाचे अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्रीमंतयोगी’ ही दैनंदिनी प्रकाशित केली आहे.
या दैनंदिनीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्या तारखेला किंवा तिथीला महाराज कोणत्या गडावर अथवा मोहिमेवर होते याची माहिती त्या त्या पानावर वाचावयास मिळते. दैनंदिनीच्या सुरुवातीला व शेवटी ख्यातनाम चित्रकार व संस्कार भारतीचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव कामत यांनी रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाचे व त्यानंतर निघालेल्या मिरवणुकीचे चित्र मुख्य आकर्षण आहे. तसेच शिवाजी महाराजांनी ज्या सेनापतींच्या सहकार्याने व समर्पणाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या मावळ्यांचे प्रसंग चित्रासह माहिती प्रत्येक महिन्याच्या शेवटी देण्यात आली आहे.
ही संग्राह्य अशी दैनंदिनी प्रत्येकाच्या घरी नव्हे तर देवघरात असावी अशी आहे. जाणत्या कलासाधकांनी आणि शिवप्रेमींनी संस्कार भारतीच्या स्थानिक कला साधकांशी संपर्क साधून ही दैनंदिनी आपल्या संग्रही ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे. संस्कार भारतीने आपल्या दैनंदिनीचे वेगळेपण जपल्याने दरवर्षी डायरी प्रकाशनाची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली असते. आजपर्यंत दिपत्कार, कलायात्री, विवेकामृत, दुर्गवंदन, संत संस्कार, वाद्यपंढरी, नृत्यसाधना, उद्गार, अमृतसरिता, बृहत्तर भारत अशा विविध विषयावरील दैनंदिनी प्रकाशित झाल्या आहेत.





