Satara : आयुष्याच्या समृद्धीसाठी वाचनाचे मोठे महत्त्व

सातारा : आयुष्य समृद्ध करण्यासाठी वाचनाचे महत्त्व खूप मोठे आहे, असे मत बदलापूरमधील ग्रंथसखा वाचनालयाचे संचालक श्याम जोशी यांनी व्यक्त केले. एमआयडीसीतील लोकमंगल हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला साहित्यिकांची सदिच्छा भेट कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य शासनाचा मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार श्री. जोशी यांना मिळाला आहे.
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, रोहिणी जोशी, मराठी अनुवादक रवींद्र गुर्जर, ग्रंथपालअर्चना कर्णिक, प्रा. विश्वास नेरकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विद्या बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्याम जोशी म्हणाले, संवाद साधण्यासाठी ज्ञान पाहिजे. चांगलं बोलणं आणि चांगलं सांगणं याला कौशल्य लागते. जे सांगायचं ते सांगायचं की नाही सांगायचं हे जो ठरवतो ती संस्कृती असते. बोलण्याचा स्तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो.
मित्र- मैत्रिणींशी ज्याप्रमाणे त्याप्रमाणे गुरुजनांशी, वडीलधाऱ्या माणसांशी आपण बोलत नाही. कारण कसं बोलायचं, कसं सांगायचं, कसं वागायचं, हे आपली संस्कृती वर्षानुवर्ष आपल्याला शिकवत आली आहे. पाचव्या शतकामधील अत्यंत दुर्मिळ पुस्तक लेखकाने प्राकृत प्रकाश या नावाने लिहिलेले असून ते आज आपण मराठी भाषा बोलतो त्याला पाचव्या शतकामध्ये प्राकृत असे म्हणत असत. अपभ्रंशातून ही मराठी भाषा हळूहळू विकसित होत गेली, से त्यांनी स्पष्ट केले. रवींद्र गुर्जर म्हणाले, वाचनाची आवड, चित्रपट नाटकांची आणि प्रवास या चामला साहित्य लेखनाला खूप फायदा झाला. पुस्तक वाचण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. एकदा तुम्हाला वाचनाची गोडी लागली की पुस्तक हातातून सुटत नाही. शिरीष चिटणीस म्हणाले, मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावना लिहिल्या पाहिजेत. आयुष्यामध्ये एखादे व्याख्यान अथवा एखादी माहिती आपले आयुष्य बदलून टाकते.
यावेळी संस्कृती कांबळे व समृद्धी विभुते या विद्यार्थिनींनी स्वरचित कविता सादर केली. कार्यक्रमास काकासो निकम, संगीता कुंभार, भास्कर जाधव, यश शिलवंत, देवराम राऊत, चंद्रकांत देवगड उपस्थित होते. प्रतिभा वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती विद्या बाबर यांनी आभार मानले.





