सातारा – मराठा आरक्षणासाठी भव्य ट्रॅक्टर रॅली

सातारा – मराठा आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गुरुवारी शहरात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सुमारे 300 ट्रॅक्टर सहभागी झाले होते. ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले. बॉम्बे रेस्टॉरंट चौक, जिल्हा परिषद चौक, पोवई नाका, शाहू चौक, राजवाडा, गोल बागेला वळसा घालून मोती चौक, पाचशे एक पाटीमार्गे, पोलीस मुख्यालय, शिवतीर्थ ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय असा ट्रॅक्टर ट्रॉलीचा मार्ग होता. प्रत्येक ट्रॅक्टर वर भगवा झेंडा लावून “एक मराठा, लाख मराठा’ च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. सातारा शहरांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाचे सत्र सातत्याने सुरू आहे.
तात्या सावंत आणि प्रकाश भोसले या दोन ज्येष्ठ नागरिकांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती गुरुवारी खालावली. त्यांना आंदोलन स्थळावरच सलाईन लावण्यात आले आहे . पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आंदोलनकर्त्यांची घटनास्थळी भेट घेतली आणि योग्य ते उपचार घेण्याची विनंती केली.
मात्र आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहून उपोषणकर्त्यांनी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यास नकार दिला. कोरेगाव तसेच सातारा तालुक्यातील काही गावांनी साताऱ्यात येऊन दुचाकीवरून रॅली काढली. त्याच दरम्यान बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून भव्य ट्रॅक्टर रॅलीला सकाळी सव्वा अकरा वाजल्यापासून सुरुवात झाली होती. ट्रॅक्टर रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने एकामागोमाग एक अशी काढण्यात आली. यावेळी होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच मार्गीका मोकळ्या ठेवण्यात आल्या होत्या. ही रॅली सातारा शहरातून सुमारे दीड तास सुरू होती. यावेळी मराठा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रा व बाईक रॅली काढून आरक्षणाच्या संदर्भात जनजागृती केली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बाईक रॅली व पदयात्रा यामध्ये पाचशे मराठा आंदोलक सहभागी झाले होते.
आरक्षणाचा हट्ट आणि उपचारास नकार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना योग्य ते उपचार मिळावे त आरोग्य यंत्रणेने त्यांच्याकडे तातडीने लक्ष द्यावे जे उपचार आहेत. ते घटनास्थळीच व्हावेत अशी अपेक्षा आहे. आंदोलनकर्त्यांनी आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका घेतली आहे. मात्र आंदोलनकर्त्या ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती खालावल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते त्यांना वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. आरक्षणाचा हट्ट आणि उपचारास नकार अशा विचित्र परिस्थितीत सध्या जिल्हा प्रशासन सापडले आहे.





