सातारा – शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सरकार सकारात्मक

सातारा – प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचा निपटारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असून राज्य स्तरावरील प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक आहे, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा आणखी उंचावून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दल आपुलकीचे स्थान निर्माण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या यशवंतराव सभागृहात जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी श्री. देसाई बोलत होते. व्यासपीठावर खा. श्रीनिवास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, आय. आय. केअर फाउंडेशनचे संचालक संतोष भोसले, उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, रवींद्र खंदारे, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, सोमनाथ खामकर आदी उपस्थित होते. शंभूराज देसाई म्हणाले, “”भविष्यातील पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत आहेत. पूर्वी दळणवळणाच्या सुविधा नसतानाही शिक्षकांनी यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई असे विद्यार्थी घडवले. आता सोयी झाल्या आहेत.
आताच्या शिक्षकांनीही चांगले विद्यार्थी घडवावेत. आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यासाठीच्या सोयीसुविधा उभारण्यात येत आहेत. आय. आय. केअरचे संतोष भोसले यांनी सीएसआर निधीतून 500 संगणक देण्याची ग्वाही दिली असून त्यातील 100 संगणकाचे आज वाटप होत आहे, ही चांगली गोष्ट आहे.”
जिल्ह्यातील मोठ्या उद्योजकांनी त्यांच्या सीएसआर निधीतून शाळांसाठी भरीव मदत करावी. शिक्षकांवरील ताण कमी करण्यासाठी लवकरच शिक्षक भरती करण्यात येणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील पूर्वीच्या व आताच्या परिस्थितीमधील फरक खा. श्रीनिवास पाटील यांनी सांगितला. शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असून जिल्हा परिषदेच्या शाळा हे बदल स्वीकारुन पुढे जात असल्याचे समाधान आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्ता चांगली असून अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी याच शाळांमधून शिक्षण घेऊन पुढे आले असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तावाढीसाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये चमकले असून सध्या एक हजार शाळांमध्ये रोज एक तास शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे, भविष्यात सर्व शाळांमध्ये ही संकल्पना राबवण्यात येणार आहे,अशी माहिती ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. शबनम मुजावर यांनी आभार मानले.





