Satara Ganeshotsav: सातारकरांनो लक्ष द्या! बाप्पाच्या आगमनासाठी फक्त ५ दिवस; ‘या’ दोन दिवशी पूर्ण बंदी…जाणून घ्या कारण
Satara Ganeshotsav: गणेशोत्सवात परवानग्यांसाठी धावपळ थांबणार; मंडळांच्या सोयीसाठी साताऱ्यात 'एक खिडकी योजना' राबवण्याबाबत सकारात्मक चर्चा.

Satara Ganeshotsav – आगामी गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समिती आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक गुरुवारी पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गणेश आगमन मिरवणुकांसाठी 29, 30 ऑगस्ट तसेच 8, 9 आणि 11 सप्टेंबर या पाच तारखा निश्चित करण्यात आल्या.
गणेश मंडळांनी आगमन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी यावेळी केले. दरम्यान, गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे ठरले. विविध परवानग्यांसाठी मंडळांना होणारी धावपळ कमी करण्याच्या दृष्टीने ‘एक खिडकी योजना’ राबविण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यासह सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीचे अध्यक्ष महेश साळुंखे, उपाध्यक्ष अभिजीत बारटक्के, सचिव अक्षय गवळी, नगरसेवक विश्वतेज बालुगडे,
चंद्रशेखर घोडके, विजय भोसले, सुजित परदेशी, मुन्ना बागवान, ऋषिकेश डांबे, पप्पू इंगवले आदी उपस्थित होते. शिस्त, समन्वय आणि सुरक्षितता या त्रिसूत्रीच्या आधारे सर्वांच्या सहकार्याने यंदाचा गणेशोत्सव सातारा शहराच्या लौकिकाला साजेसा आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.
12-13 सप्टेंबरला आगमन मिरवणूक नाही
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांना पुरेसा वेळ मिळावा, व्यापार्यांना व्यवसाय सुरळीत करता यावा आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी 12 आणि 13 सप्टेंबर रोजी कोणत्याही गणेश मंडळाने आगमन मिरवणूक काढू नये, असा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.





