जामखेड – आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे काही महिन्यांपूर्वी जामखेड तालुक्यातील खर्डा व कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी नव्याने पोलीस ठाण्याची मंजुरी मिळाली होती. त्याअनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी खर्डा व मिरजगाव पोलीस ठाणे आजपासून कार्यान्वित झाले असल्याचे सांगितले.. त्या अनुषंगाने मनुष्यबळ उपलब्ध करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या प्रतिक्षेला कायमचाच पुर्णविराम मिळाला आहे.
मिरजगाव आणि खर्डा येथे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या दोन ठिकाणी पोलीस ठाणे व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. तसेच याबाबतचा प्रस्तावही जिल्हा पोलीस प्रशासनाने गृह विभागाकडे पाठविला होता. गेल्या १० ते १५ वर्षांपासून या दोन्हीसह जिल्ह्यातील सात ते आठ ठिकाणी पोलीस ठाणे व्हावेत, अशा मागण्या स्थानिकांनी केलेल्या होत्या. तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व सध्या आमदार रोहित पवार यांनी या ठाण्यांसाठी पाठपुरावा केला होता. गृह विभागाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कर्जत पोलीस ठाण्याचे विभाजन करून मिरजगाव येथे व जामखेड पोलीस ठाण्याचे विभाजन करून खर्डा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. दोन्ही ठाण्यासाठी सध्याच्या आस्थापनेवरील प्रत्येकी ३५ जणांचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायचे आहे.
मिरजगाव हे सोलापूर महामार्गावरचे गाव असून तेथे रस्त्यावरील लुटमार, चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. आमदार प्रा. राम शिंदे, बबनराव पाचपुते पालकमंत्री असताना राशिन व मिरजगावच्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याची मागणी केली होती. तर खर्डा परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचा खून, नितीन आगे खून प्रकरणासह विविध प्रकारातील गुन्हेगारीची खर्डा येथे पार्श्वभूमी आहे. इथे पोलीस ठाण्याची मागणी तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पहिल्यांदा ग्रामस्थांनी केली होती.
क्राईम रेट जास्त असेल तरच पोलीस ठाणे मंजूर होते, या तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्यानेही जिल्ह्यात खळबळ माजली होती.
राज्यात एकीकडे सरकार बदलण्याच्या हालचालींना वेग आला असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कॅबिनेट बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये कर्जत येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर केला असताना दुसरीकडे लगेचच खर्डा व मिरजगाव पोलीस ठाणे आजपासून कार्यान्वित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
दोन्ही पोलीस ठाण्यात प्रत्येकी 6 संवर्गातील एकुण 70 अधिकारी-कर्मचारी पदभार सांभाळणार आहेत. आ. रोहित पवारांनी पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळवून दाखवलेली ही पॉवर नागरीकांच्या संरक्षणासाठी व कायदा-सुव्यवस्थेसाठी मोलाची ठरणार आहे. आज जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार खर्डा व मिरजगाव पोलीस ठाणे आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे
नव्याने कार्यान्वित झालेल्या खर्डा पोलीस ठाण्यात खर्डा. धामणगाव, तेलंगशी. जायभायवाडी, लोणी, वाकी, धनेगाव, पिंपळगाव आवळा, देवदैठण, दिघोळ पिंपळगाव उंडा, बांधखडक, नायगाव, मोहरी, सातेफळ, आपटी, नाहुली, घोडेगाव, जातेगाव, तरडगाव, सोनेगाव, बाळगव्हान, आनंदवाडी, जवळके या 24 गावाचा समावेश करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाण्यात मिरजगाव., गोंदर्डी, रातंजन, नागलवाडी, तिखी, कोकणगाव, बेलगाव, घुमरी, गुरवपिप्री, रवळगाव, निमगाव गांगर्डा, मांदळी, कोंभळी, खांडवी, मुळेवाडी, चांदे बुदुक, कौडाणे, चांदे खुर्द, खरंगेवाडी, थेरगाव, चिंचोली रमजान, वालवड, सुपे,भोसे, चखालेवाडी, रुईगव्हाण, माळेवाडी, माहि, सितपुर, नागापूर, निबोंडी, जळगाव, टाकळी खंडेश्वरी, बाभुळगाव खालसा, पाटेगाव, तरडगाव, नवसरवाडी, मलठण, आनंदवाडी, चिंचोली काळदात, डिकसळ, बिटकेवाडी, नागमठाण, थेटेवाडी, ज्योतिबावाडी या 45 गावाचा समावेश करण्यात आला आहे.