सातारा – अत्यावश्यक औषधांसाठी पाच कोटींचा प्रस्ताव

सातारा – अत्यावश्यक औषधांसाठी पाच कोटींचा प्रस्तावसातारा – क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक असलेल्या सव्वादोनशे औषधांच्या खरेदीसाठी पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या औषध विभागाकडून देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित आरोग्य विभागाची ऑनलाइन निविदा प्रक्रिया होणार आहे. सर्वांत कमी किमतीच्या निविदांना मंजुरी देण्यात येणार आहे.
नांदेड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांअभावी झालेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने सरकारी रुग्णालयांमधील औषधांच्या साठ्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तातडीची बैठक घेऊन आरोग्य विभागाला नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, याची माहिती घेतली. या बैठकीत औषध खरेदीबाबत चर्चा करण्यात आली.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, वेदनाशामक प्रतिजैविके, विविध प्रकारची इंजेक्शन्स, अँटिबायोटिक्स, सलाइन, रेबीज आणि सर्पदंशावरील औषधे, व्हिटॅमिन्सची इंजेक्शन्स, व्हिटॅमिन ए, अतिसारावरील औषधे, कॅथेटर व इतर सर्जिकल साहित्य, अशी सव्वादोनशे प्रकारची औषधे व साधने जिल्हा रुग्णालयांमध्ये गरजेची असतात. या औषधांच्या खरेदीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची रचना आणि त्यावरील अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. तोपर्यंत सध्या अत्यावश्यक असलेल्या औषधांची खरेदी जिल्हा पातळीवर करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा भासू नये, म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 30 टक्के आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातून शंभर टक्के निधी सरकारी रुग्णालयांना देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार सातारच्या जिल्हा रुग्णालयासाठी 11 कोटी रुपयांची औषध खरेदी करण्याचे शंभूराज देसाई यांनी जाहीर केले आहे.
या खरेदीसाठी तातडीच्या निविदा काढण्याची सूचना त्यांनी दिली आहे. त्यानुसार क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांच्या औषध खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला लवकरच मान्यता दिली जाणार आहे. यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रसिद्ध करून, सर्वांत कमी किमतीच्या निविदांना मंजुरी दिली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे यांनी याबाबत आढावा बैठक घेऊन महत्त्वाच्या औषधांची यादी केली आहेत. यापुढे किमान सहा महिने औषधांचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे करपे यांनी सांगितले.





