Satara : बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न करणारे पाच जण ताब्यात

कराड : कासारशिरंबे (ता. कराड) येथे मंगळवारी बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिकारीसाठी लावण्यात आलेल्या सापळ्यातून बिबट्याने धूम ठोकल्याने, संशयितांचा शिकारीचा प्रयत्न फसला. संशयितांवर वन अधिकार्यांनी पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, कासारशिरंबे येथील मारुती संभाजी बोंद्रे यांच्या उसाच्या शेतात एक बिबट्या सापळ्यात अडकला होता. गावच्या पोलीस पाटलांनी ही माहिती वन विभागास दिली. कराडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील, वनपाल बाबुराव कदम, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, वनरक्षक दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत, कविता रासवे, वनसेवक अतुल कळसे, सतीश पाटील यांनी घटनास्थळी घाव घेतली. त्यावेळी बिबट्या सापळ्याला हिसका देऊन पळून गेला. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्यांनी परिसरात फिरून तपासणी केली.
त्यावेळी प्रकाश बापूराव पवार, सुनील दिलीप पवार, विशाल दिलीप पवार, मिथुन भाऊराव शिंदे, भीमराव बाबुराव पवार (रा. भालकी, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक, सध्या रा. कासारशिरंबे) हे ऊसतोड मजूर तेथे सापडले. ते कासारशिरंबे येथे ऊसतोडीसाठी आले होते. त्यांच्याकडे दोन बहेली सापळे, तारेचा पिंजरा, टोकदार लोखंडी सळई, लाकडी मूठ असलेल्या तीन वाघर, नायलॉन दोरी, क्लच वायरचा फास असे शिकारीचे साहित्य आढळले.
हे सहित्य उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल ललिता पाटील आणि वन कर्मचार्यांनी ही कारवाई केली. ललिता पाटील तपास करत आहेत.





