सातारा – गणेशोत्सवाला शनिवार, दि. 7 पासून सुरू होत आहे. गणेशोत्सवापूर्वी पालिका हद्दीतील मिरवणूक मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत. नालेसफाईही करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ना. देसाई म्हणाले, ध्वनी मर्यादेचे पालन होण्यासाठी पोलीस दलाने दक्ष रहावे. शहरांमध्ये देखावे पाहण्यासाठी महिला, मुली मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. त्यांची छेडछाड होऊ नये, म्हणून साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी. गणेशोत्सवापूर्वी टवाळखोरांवर कारवाई करावी. गणेशोत्सवात सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विजेचा धक्का बसून, अनुचित प्रकार घडू नये, म्हणून महावितरणने दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी विद्युतवाहक तारा खाली आल्या असतील, तर त्या वर उचलून घ्याव्यात. जिल्ह्यातील धरणे 98 ते 99 टक्के भरल्याने, धरणांमधून कोणत्याही क्षणी विसर्ग करण्यात येईल. त्यामुळे नदीपात्रात गणेश विसर्जन सुरक्षित होण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी कार्यवाही करावी. नगरपालिकांकडून गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येत आहेत. या तलावांमध्ये गणेशमूर्ती पूर्णपणे विसर्जित होण्याची दक्षता घ्यावी. त्यासाठी अधिकार्यांच्या नियुक्त्या कराव्यात, अशा सूचनाही ना. देसाई यांनी केल्या.