Satara : शेतकर्यांना कर्जमुक्त करावे, अन्यथा तीव्र आंदोलन

फलटण : निवडणुकीच्या काळात सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. आता महायुतीच्या सरकारने लवकरात लवकर राज्यातील सर्व शेतकर्यांना कर्जमुक्त करावे अन्यथा रयत क्रांती संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे तहसिलदार यांना देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, सरकारने सरसकट सर्व शेतकर्यांना कर्जमुक्त करु शेतकर्यांचा सातबारा कोरा करु अशी अनेक आश्वासने दिली होती. पाच सहा महिने उलटूनही सरकारने कोणत्याही प्रकारची कर्जमाफी केली नाही. उलट निवडणुकीच्या वेळी जाहिरनाम्यात पिक कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख असूनही अद्यापही कोणतीच प्रकारच्या कर्जमाफी केली नाही. उलट सरकाराने ३१ मार्च पर्यत सर्व थकीत पिक कर्ज लवकरात लवकर भरा असे निर्देश दिले होते.
यावरून हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. विकास सेवा सोसायट्या , पतसंस्था, बॅंकांच्या वसुली अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. सरकारने कर्जवसुली त्वरीत थांबवावी अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात येईल, अशा इशारा रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब ढोपरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब ढोपरे,अनिकेत करचे, अनिल वाघमारे, बापू लांडगे, अनिल अभंग यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.





