Satara Farmers Loan: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी ‘या’ तारखेपूर्वी होणार जाहीर
Satara Farmers Loan: सातार जिल्ह्यातील सर्व बँकांना माहिती फलक लावण्याच्या सूचना; अॅग्रीस्टॅक नोंदणी उर्वरित ४,८१२ शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन.

Satara Farmers Loan – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची सातारा जिल्ह्यात पारदर्शक आणि गतीने अंमलबजावणी सुरू असून, पात्र शेतकर्यांची दुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 52 हजार 662 शेतकर्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
त्यापैकी 31 हजार 556 पात्र शेतकर्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. कर्जमुक्ती योजनेत शेतकर्यांना मिळणारी माफीची रक्कम त्यांच्या पात्रतेनुसार निश्चित केली जाणार असून, नियमानुसार एकरकमी सेटलमेंट करून लाभ देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
योजनेच्या अंमलबजावणीत कोणताही संभ्रम राहू नये म्हणून जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. प्रत्येक बँकेत योजनेबाबत माहिती फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मयत शेतकर्यांच्या वारसांनाही योजनेचा लाभ मिळावा यासाठी कर्जखाती त्यांच्या नावावर वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शेतकरी पुन्हा कर्जपात्र होण्यासाठी बँकांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, वारसांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी वारसा प्रमाणपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश तलाठ्यांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणीचाही आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत 90 टक्के अॅग्रीस्टॅक पूर्ण झाले असून, सुमारे 4 हजार 812 शेतकर्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे. शासकीय योजनांचा लाभ थेट आणि सुरळीत मिळण्यासाठी उर्वरित शेतकर्यांनी लवकरात लवकर अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी पाटील यांनी केले.





