Satara : विद्यापीठांमधील शिक्षण जगात टिकणारे पाहिजे

सातारा : शिक्षण आणि जीवन व्यवहारांचा समन्वय असणे आवश्यक आहे. जगाच्या बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे त्याचा शिक्षणामध्ये अंतर्भाव असणे आवश्यक आहे. हा समन्वय साधण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण महत्वाचे आहे, याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आणि विद्यापीठांमध्ये दिले जाणारे शिक्षण जगाच्या बाजारात टिकणारे असले पाहिजे, या दृष्टीने शैक्षणिक धोरण विकसित केले.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) प्रथम दीक्षांत समारंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरु डॉ. ज्ञानदेव मस्के, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक डॉ. हेमंत उमाप, कुलसचिव डॉ. विजय कुंभार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, ‘‘कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य पिढ्यानं पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. रयत शिक्षण संस्था त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा दाखला देते. त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित जनतेच्या शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले, कर्मवीरांचा वारसा त्यांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणासाठीच्या चिकाटीच्या बांधिलकीत आहे. शिक्षणाद्वारे वंचितांना सक्षम बनविणे, त्यांना चांगले जीवन जगण्यास सक्षम करणे यावर त्यांचा विश्वास होता.’’
आज आपण एकता, बंधुता, सामाजिक न्याय यांवर चर्चा करतो. पण याची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांनी केली. जाती, धर्माच्या आधारावर आपण माणसामाणसांत भेद करु शकत नाही. एखाद्या विशिष्ट जातीत जन्म घेतला म्हणून आपण कोणाला थोर अथवा कनिष्ठ ठरवू शकत नाही. माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या कतृर्त्वावरुन ठरते, ही गोष्ट आपण जन्मभर लक्षात ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कुलगुरु डॉ. मस्के यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा वार्षिक अहवाल सादर केला. विविध विद्या शाखांच्या अधिष्ठातांनी स्नातकांना सादर केले. विविध विद्याशाखांमध्ये उत्कृष्ट गुण मिळविलेल्या तीन स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यानंतर सर्वोत्कृष्ट गुण मिळविलेल्या 31 स्नातकांना पदवी देण्यात आली. पदवी परीक्षेत उत्तीर्ण 679 विद्यार्थ्यांच्या अर्जांनुसार पदवी देण्याची व्यवस्था विद्यापीठाने केली आहे.
विद्यापीठाची प्रगती उल्लेखनीय
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ अलिकडेच 2021 मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ आहे. पण या चार वर्षाच्या काळात या विद्यापीठाने उल्लेखनीय प्रगती केली आहे, असे सांगून विद्यापीठाचा परिसर स्वच्छ आणि सुव्यस्थित ठेवल्याबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कौतुक केले. या विद्यापीठात तीन घटक महाविद्यालयांचा समावेश आहे. सात हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे ज्ञान आणि उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी शिक्षक, प्रशासक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. पण एवढ्यावरच संतुष्ट न राहता आपण अधिकाधिक प्रगती करत राहिलो तरच विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करु शकू, असे वाहन राज्यपालांनी केले.
रोजगार संधी देण्यास प्रयत्न- दळवी
यावेळी चंद्रकांत दळवी म्हणाले, ‘‘देश व राज्य सुसंस्कृत करण्यात रयत शिक्षण संस्थेचे योगदान अमुल्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वप्नातील ग्रामीण विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न शासनाच्या धोरणामुळे शक्य झाले. शिक्षण आणि प्रशिक्षणाबरोबरच रोजगाराच्या आवश्यक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. सर्वोत्कृष्ठ विद्यापीठ बनण्याची क्षमता या विद्यापीठामध्ये आहे.’’





