सातारा – बिनबुडाच्या आरोपांना भीक घालत नाही

सातारा – सगळी सोंगे आणता येतात. पण, पैशाचे सोंग आणता येत नाही. सुविधा हव्यात, महसूल मिळायला हवा. काही महाभाग घरपट्टीच भरत नाही मग सुविधा मिळणार कशा? घरपट्टीच्या संदर्भाने टीका करणारे कोणी विद्वान असावेत, काही झाले की सातारा विकास आघाडीने लूट केली अशी टीका करायची. कारण नसताना लोकांमध्ये संभ्रम करण्यासाठी त्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. मात्र आम्ही त्या आरोपांना भीक घालत नाही, अशी जोरदार टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उदयनराजे यांनी जलमंदिर येथे पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले.
ते पुढे म्हणाले, साविआ का स्थापन झाली आहे. ती लोकांना सुविधा पुरवण्यासाठी, तुमच्याकडे एकहाती सत्ता होती. तुम्ही काम केले नाही म्हणूनच आम्हाला भूमिका घ्यावी लागली. सातारकरांचा आमच्यावर विश्वास आहे. त्याला आम्ही पात्र ठरलो आहोत.
हद्दवाढीसाठी आम्ही 124 कोटी रुपयांचा निधी आणला. सुविधा हव्या असतील घरपट्टी द्यावी लागेल. हद्दवाढीच्या भागात मुख्याधिकाऱ्यांना कॅम्प लावायला सांगितले आहे. घरपट्टीची बिले तेथे तपासून भरून घेतली जातील. काही लोक नुसतेच बिनबुडाचे आरोप करतात. मात्र आरोप करताना तीन बोटे आपल्याकडे असतात. काही लोक पालिकेच्या कारभाराची चौकशी लावणार असतील तर अगदी ईडीच्या चौकशा लावा. कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे असे उदयनराजे म्हणाले.
जातनिहाय जनगणना व्हावी
छत्रपती शिवरायांच्या वाघनख्यांच्या संदर्भाने ते म्हणाले, या विषयावर काही तज्ञांनी पुरावे दिलेले आहेत. त्यामुळे मी या विषयावर जास्त बोलणार नाही. मात्र वाघनखे इंग्लंडला पाठविण्यात आली, तेव्हा मी नव्हतो अशी मिश्किली उदयनराजे यांनी केली. मराठा क्रांती मोर्चाची जालना येथे शनिवारी सभा होत आहे त्या संदर्भाने बोलताना उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षण सभेला मी जाणार नाही. मी जात-पात मानत नाही. दर दहा वर्षावर आरक्षण दिले पाहिजे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांची चुकी आहे असे माझे ठाम मत आहे. जातनिहाय जनगणना तसेच आर्थिक निकषावर आरक्षणाचा विचार व्हावा असे ते म्हणाले.





