साताऱ्यात पुन्हा मनोमिलनाची वज्रमूठ

सातारा, {संदीप राक्षे} – दोन ध्रुवावर दोघे आपणगेल्या दहा वर्षापासून राजकीय समीकरण ठेवणारे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सध्या मनोमिलनाच्या नावेमध्ये स्वार झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षादेश मानून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्षनिष्ठा दाखवलीच शिवाय आंतरद्वंद्व असूनही बंधू सौख्य दाखवून दिले.
आता विधानसभा निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे लागणार आहे. आणि त्यांनी तसे कालच्या प्रचार सभेतून सूचितही केले.
उदयनराजे म्हणजे, साताऱ्यात राजघराण्यातील दोन्ही भावांच्या मनोमिलनाची वज्रमूठ भाजपसाठी बालेकिल्ल्याची नांदी ठरणार आहे. साताऱ्याच्या राजघराण्यामध्ये आंतरविरोध सातारकरांनी दहा वर्षात खूप वेळा पाहिले.
सुरुची राडा प्रकरण असो, बाजार समितीचा अंतर्गत संघर्ष असो किंवा नगरपालिकेतील सातारा विकास आघाडी अथवा नगर विकास आघाडी यांच्यातील विरोधाचे राजकारण, असो दोन्ही भावांमधील अंर्तगत दरी वाढत जाणार अशी परिस्थिती होती. आणि साताऱ्यात विकास नावाचा प्रकार आहे याचेच विस्मरण झाले होते.
अदालतवाड्यातील ज्येष्ठ सदस्यांच्या साक्षीने दोन्ही राजांचे 2007 मध्ये मनोमिलन झाले. मात्र, 2016 च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ही राजकीय गणिते फिसकटली. एकमेकांचा विरोध वाढत गेला.
त्यावेळी झालेली नगराध्यक्षपदाची निवडणूक हेच खरे वादाचे मूळ कारण होते. आता लोकसभा निवडणुकीपासून या विरोधावर पडदा पडला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सातारा जावळी मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे यांनी दंड थोपटले आहेत.
गेल्या पाच वर्षातील त्यांचा कायम जनसंपर्क, मोठ्या प्रमाणावर निधी आणून केलेली कामे, संघटनात्मक पातळीवील संस्थांचे जाळे, दोन साखर कारखान्यांमुळे जावळी आणि सातारा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे यांची मतदारसंघावर मजबूत पकड आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला उलटफेर घडवायचे असतील तर त्यांना राजकीय चमत्कार तारू शकतो.
गेल्या पाच वर्षांमध्ये साताऱ्याचे दोन्ही राजे राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाले. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवेंद्रसिंहराजे यांची गळाभेट घेऊन वैर संपवल्याचे उदयनराजे यांनी सूचित केले.
शिवेंद्रसिंहराजे यांनी सुद्धा पक्षनिष्ठा आणि बंधू सौख्य या दोन्ही पातळीवर शंभर टक्के काम करून उदयनराजे यांना संघर्षपूर्ण विजय मिळवून दिला. त्यामुळेच कालच्या प्रचार सभेत कोण मोठं नसतं ,कोण छोटं नसतं, वेळ आल्यावरच कळतं हे सूचक वाक्य उदयनराजे यांनी केले होते
आता मनोमिलनासंदर्भाने साताऱ्यात पुढील दहा वर्षांमध्ये सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आठही मतदारसंघांमध्ये उदयनराजे फिरणार आहेत. तसे त्यांनी संकेतही दिले आहेत.
मात्र, सातारा- जावळी मतदारसंघावर त्यांचे विशेष ममत्व राहणार असून यापुढे दोन्ही राजांचे निर्णय एकदिलाने होतील. महायुतीचे सरकार आल्यास पुढील मंत्रिमंडळात शिवेंद्रसिंहराजे यांना स्थान मिलावे, याकरता उदयनराजे यांच्याकडून विशेष प्रयत्न होतील अशी अपेक्षा आहे.
प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोमीलन…
सातारा एमआयडीसीचे प्रश्न, देगावची एमआयडीसी, बोंडारवाडी धरणाचा प्रलंबित प्रश्न, रखडलेले सिंचन प्रकल्प, शहराच्या हद्दवाढ क्षेत्रातील नियोजित विकास, रखडून पडलेले आयटी हब, पर्यटनासाठी मतदारसंघांमध्ये मूलभूत सुविधांचा विस्तार या विविध कामांसाठी मनोमिलनाची वज्रमूठ असणे गरजेचे आहे.
राजकीय हेतूने का होईना दोन्ही राजे एकमेकांच्या राजकीय पाठबळासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहिले हे भाजपच्या सुद्धा पथ्यावर पडणारे आहे.
छत्रपतींचे वारसदार म्हणून उदयनराजे यांचा देशभरात असणारा दबदबा आणि शिवेंद्रसिंहराजे यांची पाचव्या टर्मकडे सुरू झालेली दमदार वाटचाल या सर्व गोष्टी भाजपला साताऱ्यात बालेकिल्ला बनवण्यासाठी अनुकूल ठरले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा साताऱ्यात आपले पाय रोवण्यासाठी मोठ्या राजकीय ताकतीची गरज असणार आहे. मनोमिलनाचा अध्याय पुढे सुरु राहून त्या निमित्ताने साताऱ्याचा नियोजनबद्ध विकास केला जावा या अपेक्षा सातारकरांनी केल्यास त्यात गैर नाही





