Satara : साताऱ्यातील सुभाषचंद्र बोस चौकात रणगाडा स्थानापन्न

सातारा : भारत- पाकिस्तान युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या टी 55 रणगाडा सातारा शहरातील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये बसवण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मध्यरात्री केली. यावेळी ॲड. विनित पाटील आणि उदयनराजे समर्थक उपस्थित होते. या रणगाड्यामुळे सातारा शहराच्या सौंदर्याला वेगळे परिमाण मिळाले आहे. या रणगाड्याचे उद्या (दि. 24) विशेष कार्यक्रमात अनावरण होणार आहे.
सातारा जिल्हा जसा क्रांतिकारकांचा तसा लष्करी सेवेत सहभागी असणाऱ्या जवानांचाही जिल्हा आहे. ही लष्करी ओळख आणखी वृद्धिंगत करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय लष्कराकडे सातारा शहरास रणगाडा देण्यासंदर्भात विशेष पाठपुरावा केला होता. तसेच या रणगाड्यासाठी येथील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये विशेष जागेची व्यवस्था करण्यात आली. शाहू स्टेडियमजवळ दौलतनगर, करंजे ग्रामीण, बस स्थानक आणि सदरबाजार या भागांना जोडणाऱ्या सुभाषचंद्र बोस चौकामध्ये टी 55 रणगाडा रात्री उशिरा बसवण्यात आला.
या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. एका अवजड क्रेनच्या सहाय्याने टी 55 रणगाडा चौकाच्या मधोमध बसवण्यात आला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त या चौकात बसवलेल्या रणगाड्याचे उद्या (दि. 24) रोजी विशेष कार्यक्रमात अनावरण होणार आहे.
जिल्ह्याच्या लष्करी परंपरेची ओळख
सातारा शहरामध्ये सैनिक स्कूल तसेच रायगाव येथील छाबडा मिलिटरी स्कूलमध्ये दोन रणगाडे यापूर्वीच बसवण्यात आले आहेत. मात्र, त्यांची रचना शाळांअंतर्गत भागात आहे. मात्र, सध्या बसवण्यात आलेल्या टी 55 रणगाडा सातारकरांसह शहरातून येणारे जाणारे प्रवासी येता जाता पाहू शकणार आहेत. या रणगाड्यामुळे चौक परिसराला विशेष शोभा आली असून शहराची तसेच जिल्ह्याच्या लष्करी परंपरेची ओळख नव्याने वृद्धिंगत होणार आहे. या आगळ्यावेगळ्या अनावरण कार्यक्रमाची सातारकरांना विशेष प्रतीक्षा आहे.





