सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूकदार असोसिएशनतर्फे आनेवाडी टोलनाक्यावर करण्यात येणार आंदोलन

सातारा (प्रतिनिधी) : मोठ्या प्रमाणावर टोल घेऊनही महामार्गावर कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत तसेच महामार्गाच्या दूरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यांच्या विरोधात सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूकदार असोसिएशनतर्फे शनिवारी सकाळी दहा वाजता आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गवळी यांनी दिली.
महामार्गावर टोल घेऊन सुद्धा कराराप्रमाणे कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना तसेच सामान्य जनतेला याचा त्रास होत आहे. पुणे सातारा टोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भुईंज पोलीस ठाण्याच्या माध्यमातून वेळोवेळी समज देऊन सुद्धा कोणत्याही सुधारणा यांच्याकडून होत नाहीत. त्याचबरोबर गेली 13 वर्ष आम्ही वारंवार आंदोलन करून सुद्धा रस्त्यांच्या अवस्थेमध्ये सुधारणा होत नाही. फक्त टोलचे दर नियमाप्रमाणे दरवर्षी वाढवले जातात.
या सर्व गोष्टींच्या विरोधात शनिवारी दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आनेवाडी टोल नाका येथे संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व वाहतूकदारांनी या आंदोलनात सामील व्हावे, वाहनधारकांना होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी सर्व वाहनधारकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन प्रकाश गवळी यांनी केले आहे.





