सातारा (श्रीकांत कात्रे) – विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठही मतदारसंघात चुरशीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. त्यातही माजी मुख्यमंत्री, एक कॅबिनेट मंत्री आणि दोन माजी मंत्र्यांसह काही मातब्बर उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांच्या मतदारसंघांबाबत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात मोठी चर्चा आहे. जिल्ह्यातील आठही मतदारसंघात प्रमुख लढतींकडे राजकीय गोटासह सर्वांचेच लक्ष आहे. कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, कोरेगाव या मतदारसंघात या प्रतिष्ठेच्या लढती होत आहेत. उमेदवारी जाहीर होईपर्यंत एकतर्फी वाटणाऱ्या मतदारसंघातही आता बलाढ्य उमेदवारांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. त्यात वाई, माण, फलटण या मतदारसंघांचा समावेश आहे. कराड दक्षिणमध्ये टस्सल… माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते यापूर्वी २०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षी या मतदारसंघातून निवडून आले आहेत. दोन्ही वर्षी भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांची त्यांच्याशी निकराची लढत दिली. त्यापूर्वी डॉ. अतुल भोसले यांनी कराड उत्तरमधूनही निवडणूक लढवली होती. तिन्ही वेळा त्यांना यशाने हुलकावणी दिली. आता त्यांच्या पदरात हार की विजयाची माळ पडणार याबाबत उत्सुकता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात आणि त्यापूर्वीही खासदार व केंद्रात मंत्री असताना विविध विकास कामे केली. गेल्या दोन टर्ममध्येही त्यांनी मतदारसंघाशी संपर्क ठेवत विकासकामांसाठी निधी खेचून आणल्याचे सांगितले जाते. त्याशिवाय ही शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन ते करतील, असेही सांगण्यात येते. त्याशिवाय चव्हाण राज्यपातळीवर पक्षासाठी नेतृत्व करत असल्याने त्यांनी प्रतिमा मोठी आहे. त्यांच्या या जमेच्या बाजू आहेत. डॉ. अतुल भोसले यांनीही गेल्या निवडणुकीतील पराभवानंतर मतदारसंघातील संपर्क वाढविला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांशी संपर्कात राहिल्याने महायुती सरकारच्या काळात कराड शहर तसेच ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे व निधी त्यांनी आणला आहे. कृष्णा साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटलसह कृष्णा समूहातील विविध शाखांच्या माध्यमातून ते कार्यरत राहतात. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, अपेक्षेएवढा संपर्क दोन्ही बाजूने होत नसल्याच्या तक्रारीही आहेतच. मतदारसंघात कराड शहराचा समावेश आहे. त्यामुळे कराड नगरपालिकेच्या राजकारणाचा या मतदारसंघातील प्रभाव मोठा आहे. दक्षिणमधील उंडाळकर यांचा गट मोठा आहे. त्यामुळे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची भूमिका महत्त्वाची असते. सध्या ते काँग्रेसमध्ये असल्याने ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असतील, असे मानण्यात येते. कराड शहर आणि उंडाळकर गट या दोन्ही प्रभावी बाबी या मतदारसंघातील निकालावर परिणाम करणाऱ्या ठरणार आहेत. तिरंगी लढतीमुळे पाटणमध्ये रंगत – पाटणमधून राज्याचे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई शिवसेना शिंदे गटाकडून रिंगणात आहेत. देसाई व पाटणकर यांच्या गटांमधील ही लढत पारंपरिक असते. मात्र, यावेळी या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांशिवाय त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हर्षद कदम या युवा नेतृत्त्वाला संधी दिली आहे. त्यामुळे येथील लढत आता तिरंगी होणार आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सत्यजितसिंह पाटणकर यांना उमेदवारी मिळण्याची खात्री येथे व्यक्त होत होती. मात्र, तसे न झाल्याने पाटणकरांनी बंडाचा झेंडा फटकवला आहे. वास्तविक, शंभूराज देसाई मंत्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकासकामे व ऩिधी आणून त्यांनी झंझावात निर्माण केला. या बलाढ्य नेत्यापुढे उभे राहणे अवघड वाटत होते. पाटणकर यांनी तशी तयारीही केली होती. या मैदानात तिसरा उमेदवार येण्यामागे कोणाची खेळी तर नाही ना, अशी शंकाही आहे. ठाकरे गटाला उमेदवारी देण्यामागे प्रामुख्याने शिवसेनेच्या मतांची विभागणी होऊन तिसरा उमेदवार निवडून यावा, अशी रणनीती इथे दिसते. अर्थातच अशी राजकीय खेळी कोण करु शकते, याचीही जिल्ह्यात चर्चा आहे. तरीही आता या मतदारसंघात रंगत निर्माण झाली आहे, एवढे खरे आहे. कराड उत्तर व कोरेगावातही झुंजच – माजी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील कराड उत्तर मतदासंघातून षटकार मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून रिंगणात आहेत. भाजपच्या मनोज घोरपडे यांनी यावेळी त्यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. कोरेगावमधून माजी मंत्री शशिकांत शिदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लढत आहेत. त्यांना शिवसेनेच्या (शिंदे) आमदार महेश शिंदे यांच्याशी सामना करावा लागत आहे. हे दोन्ही आक्रमक नेते मैदानात असल्यामुळे या मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष आहे. वाईत भोसले गटाची भूमिका महत्त्वाची – वाईत चौकार मारण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मकरंद पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ यांना रिंगणात उतरविले आहे. वाई मतदारसंघात पाटील- भोसले- पिसाळ असे प्रमुख गट आहेत. त्यात पिसाळ गट उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाला. भोसले गटाकडून दिवंगत नेते प्रतापराव भोसले यांचे नातू ईशान भोसले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांची उमेदवारी कायम राहिली तर या लढतीतही रंग भरणार आहे. आगामी निवडणुकांच्यादृष्टीने मतदारसंघातील भोसले गट शाबूत राहण्यासाठी ईशान मैदानात असतील, अशीही अटकळ आहे. रामराजे प्रचारापासून दूर राहणार? फलटणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विद्यमान आमदार दीपक चव्हाण लढत देत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सचिन कांबळे पाटील रिंगणात आहेत. ही जागा भाजपची. महायुतीमध्ये ती अजित पवार यांच्याकडे गली. त्यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ठरवलेल्या उमेदवारालाच संधी दिली. या मतदारसंघातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर सध्या अजित पवार गटाकडे आहेत. आमदार दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह बाकीचे सैन्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे दाखल झाले आहे. त्यापूर्वीच अजित पवार यांनी या मतदारसंघातून दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करुन टाकली होती. पण चव्हाण यांनी ऐनवेळी पक्ष बदलल्याने पवार यांनी रणजितसिंहांचा उमेदवार आयात केला. त्यामुळे रामराजे आता प्रचाराच्या रिंगणात असतील की नाही याची साशंकता आहे. एकाच उमेदवारामुळे गोरेंपुढे आव्हान – माणमध्ये भाजपचे जयकुमार गोरे बलाड्य उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून येथील उमेदवारी प्रभाकर घार्गे यांना दिली. घार्गे यांच्याप्रमाणेच पक्षाकडून प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभय जगताप तसेच काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख इच्छुक होते. यांच्यापैकी एकच उमेदवार रिंगणात आल्याने गोरे यांच्यासमोर आता आव्हान निर्माण झाले आहे. शिवेंद्रसिंहराजे यांचा सावध पवित्रा – सातारा – जावळी मतदारसंघात विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पाचव्यांदा विजयी होण्यासाठी भाजपकडून मैदानात उतरले आहेत. तुल्यबळ असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांना पर्याय कोण असा प्रश्न विरोधकांसमोर होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष असणारे अमित कदम यांनी उमेदवारीसाठी शरद पवार यांच्याकडे प्रयत्न केले. अखेर त्यांना महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली. अमित कदम यांनीप्रचार सुरु केला आहे. या स्थितीत शिवेंद्रसिंहराजे यांनी सावध पवित्रा घेत पूर्वीपासून सुरु असलेल्या प्रचाराला अधिक गती दिली आहे.