Mohammad Azharuddin। भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांना तेलंगणा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेत (एमएलसी) त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. काही आठवड्यांपूर्वीच अझरुद्दीन यांनी ज्युबिली हिल्स विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून स्वतःची घोषणा केली होती, त्यामुळे हा निर्णय आश्चर्यकारक आहे. २०२३ च्या निवडणुकीत त्यांच्या गृह मतदारसंघात पराभव झाल्यानंतर ते पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार झाले होते. प्रत्यक्षात आमदार मागंती गोपीनाथ यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे. एमएलसी पदासाठी नामांकन मिळाल्यानंतर तेलंगणा काँग्रेस युनिटचे कार्यकारी अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांनी यावर आनंद व्यक्त केला. अझरुद्दीन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “तेलंगणामध्ये राज्यपाल कोट्याअंतर्गत एमएलसी पदासाठी मला नामांकित करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे मी अत्यंत सन्मानित आहे. काँग्रेस अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे जी, श्रीमती सोनिया गांधी मॅडम, श्री राहुल गांधी जी, श्रीमती प्रियंका गांधी जी आणि श्री के.सी. वेणुगोपाल जी यांचे विश्वास आणि आशीर्वादाबद्दल मनापासून आभार.” असे म्हटले आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेही आभार मानले आणि लिहिले की, “मी प्रामाणिकपणा आणि समर्पणाने माझ्या राज्याची सेवा करण्यास वचनबद्ध आहे.” आयएएनएसच्या वृत्तानुसार, अझरुद्दीन यांच्या एमएलसी म्हणून नामांकनामुळे त्यांचा राज्य मंत्रिमंडळात सामील होण्याचा मार्ग मजबूत होईल असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. तेलंगणा सरकारमध्ये किती मंत्री? Mohammad Azharuddin। सध्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह १४ मंत्री आहेत. ३ जागा रिक्त आहेत. तेलंगणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होण्यापूर्वी, मोहम्मद अझरुद्दीन हे उत्तर प्रदेशातील मुरादाबादचे खासदार होते (२००९-२०१४). २०१९ मध्ये ते हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे २७ वे अध्यक्षही बनले. ६२ वर्षीय मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारतासाठी ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी अनुक्रमे ६२१५ आणि ९३७८ धावा केल्या आहेत.