सातारा – चिंचणेर वंदन येथे फटाकाबंदीचा निर्णय

सातारा – शूरवीर सैनिकांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या चिंचणेर वंदन, ता. सातारा येथील गावांमध्ये सर्व ग्रामस्थांनी एकमताने फटाके बंदीचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
चिंचणेर वंदन हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावांमध्ये सर्व ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागाने विविध सामाजिक, शासकीय, सार्वजनिक उपक्रम राबवले जातात. लोकसहभाग हे या गावचे खास वैशिष्ट्य. याचेच एक उदाहरण म्हणजेच फटाके बंदी होय.
चिंचणेर वंदन ग्रामपंचायतने माझी वसुंधरा अभियान ५.0 या अभियानात सहभाग घेतला असून या ग्रामपंचायतीने नुकतेच पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा केला.
ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये फटाके बंदीचा एकमुखी निर्णय घेऊन फटाके मुक्त व पर्यावरण पूरक सर्व प्रकारचे सण उत्सव साजरा करण्याचा एक समाज हिताचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कार्य सर्वांच्या सहकार्याने करण्याचे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये निश्चित झालेले आहे. त्यानुसार चिंचणेर वंदन येथे सर्व प्रकारचे सण, उत्सव पर्यावरण पूरक साजरे करण्याचे ठरल्याने फटाक्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून एकाही व्यावसायिकाला फटाके विक्रीस परवानगी दिलेली नाही.
याकामी ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी, गावातील विविध संस्था, सर्व तरुण मंडळे यांचे आजी-माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिला बचतगट या सर्वांच्या एकत्रित सहभागाने हे अभियान यशस्वी करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतने ठेवले आहे.
==============





