Satara DCC Bank Election: जिल्हा बँकेत शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा डाव! शेखर गोरेंच्या एन्ट्रीने महायुतीत नवा ट्विस्ट
Satara DCC Bank Election: शेखर गोरे यांच्या पक्षप्रवेशानंतर माण-खटावच्या राजकारणात नवी समीकरणे; भाजपच्या आक्रमक मोर्चेबांधणीला शिंदेसेनेचे प्रत्युत्तर.

Satara DCC Bank Election- जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपकडून सुरू असलेल्या आक्रमक मोर्चेबांधणीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना (शिंदे) गटानेही आपली राजकीय ताकद दाखविण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. माण- खटावमध्ये शेखर गोरे यांच्या प्रवेशामुळे शिंदेसेनेला स्थानिक पातळीवर नवी ताकद मिळाली असून, या ताकदीचे प्रतिबिंब जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमटणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला नाही, तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी दिसलेल्या अंतर्गत संघर्षाची पुनरावृत्ती होणार का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शेखर गोरे यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने माण-खटावच्या राजकारणात समीकरणे नव्याने मांडली जात आहेत. या दोन्ही तालुक्यांमध्ये गोरे यांची स्वतंत्र राजकीय ताकद असल्याने शिंदेसेनेच्या जिल्ह्यातील विस्तारासाठी त्यांचा वापर करण्याचे पक्षाचे धोरण असू शकते, अशी चर्चा आहे.
पक्ष संघटन वाढविण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा शब्द गोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदेसेना आपल्या नव्या राजकीय ताकदीचा किती आग्रह धरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विशेषतः ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रभावक्षेत्रात शेखर गोरे यांची शिंदे सेनेतील सक्रियता वाढल्यास माण-खटावमध्ये महायुतीतील अंतर्गत राजकारणालाच नवे वळण मिळू शकते. त्यामुळे हा विषय केवळ जिल्हा बँकेपुरता मर्यादित न राहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान महायुतीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेली नाराजी आणि त्यानंतरची राजकीय रस्सीखेच अद्याप पूर्णपणे विस्मरणात गेलेली नाही. त्यातच आगामी जिल्हा बँक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील जागावाटप हा आगामी राजकीय समीकरणांचा ‘ट्रायल बॉल’ ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी चर्चेचे कोणतेही पत्ते ओपन केले नाही.
भाजप- शिंदेसेनेत धुसफूस वाढली तर…
जिल्हा बँकेतील जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्यास त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महायुतीतील घटकांमध्ये निर्माण झालेला संघर्ष हा त्याचा ताजा संदर्भ आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत कोणाला किती जागा मिळतात, याकडे केवळ सहकारी क्षेत्रातील निवडणूक म्हणून पाहिले जात नाही.
भाजपने आपल्या ताकदीच्या प्रमाणात आग्रह धरला आणि शिंदेसेनेने माण-खटावसह जिल्ह्यातील वाढत्या राजकीय प्रभावाच्या आधारे स्वतंत्र वाटा मागितला, तर जागावाटपाची चर्चा अधिक ताणली जाऊ शकते. हा तिढा न सुटल्यास स्थानिक पातळीवर स्वतंत्र राजकीय वाटचालीचे पर्याय चर्चेत येऊ शकतात. मात्र, महायुतीतील अंतिम निर्णय नेतृत्वाच्या पातळीवरच होणार असल्याने बँक बिनविरोध होणार का हा सध्या औत्सुक्याचा विषय आहे .






