Satara Crime: “कोर्टात पाऊल ठेवशील तर जिवंत सोडणार नाही!”; जमिनीच्या वादातून शेतकर्यावर हल्ला
Satara Crime: तरडगाव हद्दीत शिवार हॉटेलसमोरील घटना; लोखंडी पाईप, गज अन् दगडाने मारहाण केल्याप्रकरणी डोंबाळवाडीतील चौघांवर गुन्हा दाखल.

Satara Crime – जमिनीच्या वादातून न्यायालयीन प्रकरण सुरू असताना कोर्टात येऊ नये, यासाठी दबाव आणत एका शेतकर्यावर चौघांनी लोखंडी पाईप, गज, लाकडी दांडा आणि दगडाने हल्ला केल्याची घटना तरडगाव हद्दीत शिवार हॉटेलसमोर घडली. या मारहाणीत शेतकरी जखमी झाला असून, ‘दाव्याच्या तारखेला कोर्टात आलास तर तुला जिवे मारून टाकीन,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी नाथा रामदास येळे, वैशाली शंकर कोकरे, संगीता रामदास येळे आणि शंकर महादेव कोकरे (सर्व रा. डोंबाळवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय महादेव कोळेकर, (वय 41, रा. डोंबाळवाडी) हे शुक्रवार दि. 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तरडगाव हद्दीतील शिवार हॉटेलसमोर थांबले होते.
त्यावेळी जमिनीच्या दाव्याच्या तारखेला न्यायालयात येऊ नये, असे सांगत नाथा येळे याने लोखंडी पाइपने कोळेकर यांच्या मानेवर मारहाण केली. त्यानंतर वैशाली कोकरे हिने लोखंडी गजाने पाठीवर मारहाण केली, संगीता येळे हिने शिवीगाळ करून कुर्हाडीच्या लाकडी दांड्याने डाव्या पायाच्या गुडघ्यावर मारले.
याचवेळी शंकर कोकरे याने शिवीगाळ करत दगडाने उजव्या हाताच्या बोटाला मारले. या घटनेनंतर 31 जुलै रोजी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार वाघ तपास करत आहेत. घटनास्थळी सपोनि जायपत्रे यांनी भेट दिली असून, संशयितांच्या अटकेबाबत पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
जमिनीच्या वादाला हिंसक वळण
जमिनीच्या वादातून न्यायालयीन प्रक्रियेवरच दबाव आणण्यासाठी मारहाणीचा मार्ग अवलंबल्याच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. न्यायालयीन प्रकरणात संबंधित व्यक्तीला धमकावून कोर्टात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





