Pune District : शेताच्या बांधाच्या वादातून शेतकर्यावर जीवघेणा हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा
Pune District : या प्रकरणी रमेश शिंदे यांच्या पत्नी लता रमेश शिंदे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील लेंडे-बामणे मळा परिसरात शेताच्या बांधाच्या किरकोळ वादातून 60 वर्षीय शेतकर्यावर लाकडी काठी व दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकर्याच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रमेश सीताराम शिंदे हे त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना शेजारील नवनाथ जगन्नाथ शेळके व संजय जगन्नाथ शेळके यांनी शेताचा बांध नांगरल्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. हा वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला. फिर्यादीनुसार, नवनाथ शेळके यांनी लाकडी काठीने रमेश शिंदे यांच्या पायावर व पाठीवर मारहाण केली. ते खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगडाने वार करण्यात आला.
या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. जखमी रमेश शिंदे यांना प्रथम घरी आणण्यात आले. मात्र रात्री त्यांना चक्कर येणे, उलट्या होणे आणि प्रकृती बिघडल्याने आळेफाटा येथील युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ते जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी रमेश शिंदे यांच्या पत्नी लता रमेश शिंदे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ जगन्नाथ शेळके आणि संजय जगन्नाथ शेळके या दोघांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





