Satara Crime: फक्त ४८ तास घर बंद आणि..; चोरट्यांनी साधला डाव, व्यावसायिकाला मोठा धक्का

प्रभात वृत्तसेवा
सातारा – शहरातील करंजे (सातारा) येथील व्यावसायिकाच्या घरातून मंगळवार दि. 9 रोजीच्या मध्यरात्री अज्ञाताने पावणेचार लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी व्यावसायिक अभिजित हिरालाल दोशी (वय 50) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिजित दोशी दोन दिवस फिरायला परराज्यात गेले होते. घर बंद असल्याने चोरट्यांनी पाळत ठेवली होती. मंगळवारी मध्यरात्री दोशी यांच्या घराचा सेफ्टी डोअरचा कडी कोयडा तोडून अज्ञाताने आत प्रवेश केला.
कपाटात ठेवलेला सोन्याचा चपलाहार, नेकलेस, चेन, नथ, चांदीची कृष्णाची मूर्ती, गाई, दोन मोर, पोपट मूर्ती, तीन डीश, आठ वाट्या, लोटी व घंटी, जग, तरबाण, चांदीचा चमचा, ग्लास, 50 हजार रुपये रोख रक्कम असा 3 लाख 79 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
घटनेची माहिती मिळताच अभिजित यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.





