डासांच्या प्रादुर्भावामुळे सातारा शहर आजारी

सातारा – गेल्या काही दिवसांमधील पाऊस, वातावरणातील चढउतार, डासांची वाढलेली उत्पत्ती या कारणांमुळे सातारा शहरात ताप, सर्दी, खोकला, डेंगी, चिकनगुनिया, न्यूमोनिया अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरात फ्लूची साथ पसरल्याने सर्वच वयोगटातील नागरिकांना या आजाराचा सामना करावा लागत आहे. डास आणि वातावरणातील बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरात फ्लू आणि अन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे. त्यामुळे मेडिकल दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. ताप, सर्दी, खोकला या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने पॅरासिटॅमॉल, कफ सिरप या औषधांना सर्वाधिक मागणी आहे. सध्या दहा ते पंधरा टक्क्यांनी औषधांची मागणी वाढल्याचे केमिस्ट असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले.
मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. अशा रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार करावे लागत आहेत. डेंगी, चिकनगुनिया, इनफ्लूएंझा, न्यूमोनिया आजारांची लक्षणे आहेत. मात्र, तपासणी पॉझिटिव्ह येत असल्याचे अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे. सुरुवातीच्या सात दिवसांत तपासणी केल्यास चिकनगुनियाच्या काही रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता कमी असते.
सात दिवसानंतर 60 ते 70 टक्के % ग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो. नागरिकांनी न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच वयोगटात डेंगी, चिकनगुनिया, फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ताप येणे, गुडघे दुखणे, सांधेदुखी, अशक्तपणा शरीरावर सूज अशी लक्षणे दिसून येत आहेत. चिकनगुनिया आणि फ्लूचा संसर्ग झालेल्या मुलांना बरे होण्यासाठी आठ ते दिवसांचा कालावधी जात आहे. न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी दिली आहे
धूर फवारणीचा कार्यक्रम हाती…
संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने धूर फवारणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सर्व प्रभागांमध्ये धूर फवारणी करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक खरेदी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. बुधवार नाका, लक्ष्मी टेकडी, समर्थ मंदिर परिसर, शाहूनगर, शाहूपुरी भागातील पवार कॉलनी, जगतापवाडी येथील परिसरात पाण्यामुळे निर्माण झालेल्या दलदलीमध्ये डासांची उत्पत्ती होत असून त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.





