सातारा | बॉम्बे-रेस्टॉरंट-माहुली रस्त्यावर चिखल पसरल्याने नागरिक त्रस्त

कृष्णानगर – सातारा-लातूर महामार्गाचे काम गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. त्याचबरोबर शासकीय महाविद्यालयाचे काम कृष्णानगर येथे सुरू आहे. या कामांसाठी वाळू, खडी, मुरुम आदींची वाहतूक अवजड वाहनांमधून सुरू आहे. पावसामुळे रस्त्याकडेच्या साइडपट्ट्यांवर चिखल झाला असून, हा चिखल वाहनांच्या टायर्समुळे रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे बॉम्बे रेस्टॉरंट ते माहुली या दरम्यानचा रस्ता चिखलमय झाला आहे. त्यावरून वाहने चालवताना कराव्या लागत असलेल्या कसरतींमुळे चालक वैतागले आहेत.
सातारा-लातूर महामार्गाचे काम मेघा इंजिनिअरिंग कंपनी करत असून, कृष्णानगरपासून माहुलीपर्यंतचे काम गेले कित्येक महिने संथगतीने सुरू आहे. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम कृष्णानगर येथे न्याती इंजिनियर्सकडून, सैनिक स्कूल येथील काम हर्ष कन्स्ट्रक्शनकडून, सातारा नगरपरिषदेचे काम टी अँड टी इन्फ्राकडून सुरू आहे.
या सर्व कंपन्यांच्या साइटस्वर वीट, वाळू, खडी, मुरुम यांची वाहतूक अवजड वाहनांमधून सुरू आहे. या कंपन्यांच्या रेडीमिक्स काँक्रिट प्लँटमधून रेडीमिक्सची वाहतूक करणार्या ट्रकच्या टायर्समुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल पसरत आहे. त्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने, दुचाकी वाहने घसरत आहेत. यामध्ये अनेक जण जखमी होत असून, वाहनांचेही नुकसान होत आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौक व पोवई नाका येथे वळण घेताना सिमेंटचा राडारोडा रस्त्यावर पसरत आहे. याबद्दल सैनिक स्कूल प्रशासन, वाहतूक पोलीस शाखा, नगर परिषद, जिल्हा रुग्णालय प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर अपघात होअन, जीवितहानी झाल्यास, कोणाला जबाबदार धरायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.





