Satara BJP – सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष अॅड. दत्तात्रय बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब उर्फ विनोद खंदारे यांच्यात झालेल्या जोरदार शाब्दिक चकमकीने भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड्यावर आली आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यपद्धतीवरून सुरू झालेल्या वादात खंदारे यांनी बनकर यांच्या शैलीची तुलना थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या “हुकूमशाही”शी करत केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात प्रचंड तणाव निर्माण झाला. सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ च्या कलम ५६ नुसार सभागृहातील असंसदीय शब्द रेकॉर्डवरून काढून टाकणे तसेच संबंधित सदस्यांना समज देणे किंवा सभागृहाबाहेर जाण्याचे निर्देश देण्याचा अधिकार नगराध्यक्षांना आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र खंदारे यांना शांत करण्यासाठी त्यांना पराकोटीचे प्रयत्न करावे लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “मंजूर एक्सप्रेस”वरून खंदारेंचा हल्लाबोल सभेतील अनेक विषय कोणतीही सविस्तर चर्चा न करता मंजूर करण्याच्या उपनगराध्यक्षांच्या भूमिकेवर खंदारे यांनी जोरदार आक्षेप घेतला. “प्रत्येक विषय सभागृहात वाचला जाऊन त्यावर सखोल चर्चा व्हायला हवी,” अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र ही भूमिका मांडताना वापरलेली आक्रमक आणि असंसदीय भाषा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. सातारा नगरपालिका. खंदारे यांच्या वक्तव्यानंतर खासदार उदयनराजे भोसले गट आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गट यांच्यातील दरी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. “मनोमिलन”च्या राजकारणाचा दावा केला जात असला तरी कार्यकर्त्यांच्या पातळीवर दोन स्वतंत्र आघाड्या अजूनही सक्रिय असल्याचे या घटनेतून दिसून आले. भाजपमधील दोन सत्ताकेंद्रे पुन्हा चर्चेत गेल्या काही वर्षांत विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांदरम्यान खासदार उदयनराजे भोसले हे विविध कारणांमुळे तुलनेने दूर राहिले. दुसरीकडे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा आणि तालुक्याच्या राजकारणात भाजपला आक्रमकपणे पुढे नेले. त्यामुळे पक्षातील त्यांचे राजकीय वजन लक्षणीय वाढले आहे. नगरपालिकेतील सत्तेची सूत्रे देखील प्रत्यक्षात शिवेंद्रसिंहराजे गटाकडे असल्याचे मानले जाते. त्यामुळे आज सभागृहात उपनगराध्यक्ष बनकर यांच्यावर झालेला आक्रमक हल्ला हा केवळ एका दिवसाचा राग नसून खासदार गटाच्या कार्यपद्धतीला लक्ष्य करण्याची पद्धतशीर रणनीती असल्याची “अदृश्य चर्चा” राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. “सुंदोपसुंदी” की संघटनात्मक शिस्त? भाजपच्या प्रोटोकॉलनुसार सर्वसाधारण सभेपूर्वी पक्ष बैठक घेऊन चर्चेची लाईन ऑफ ॲक्शन ठरवली जाते. मात्र त्यानंतरही सभागृहातच उघडपणे एकमेकांवर टीका होत असल्याने संघटनात्मक शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, “ही केवळ वैयक्तिक नाराजी नाही. सातारा भाजपमध्ये दोन नेतृत्वांच्या प्रभावाचा संघर्ष अजूनही कायम आहे. त्याचे पडसाद आता थेट सभागृहात उमटू लागले आहेत.”