सातारा – मंडलाधिकार्यांवर कारवाईसाठी भीमशक्ती संघटनेचे आंदोलन

श्रावण बाळ व संजय गांधी निराधार लाभार्थी योजनेचा वयोवृद्ध पेन्शन यांना लाभ बंद करण्याचा निर्णय नागठाणे मंडलाधिकारी यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे सदस्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद आहे की, दरवर्षी शासन निर्णयानुसार 21000 पर्यंतचे उत्पन्नाचे दाखल्यांची मागणी तहसीलदार सातारा यांच्याकडून होत असते. अशा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना दाखल्यांना कधीच विरोध झाला नाही. मात्र, यावर्षी हे उत्पन्नाचे दाखले देण्यात नागठाणे मंडलाधिकारी नकार देत आहेत. त्यामुळे वयोवृद्ध निराधार व्यक्तींचे लाभ बंद होत आहेत. असे करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही.
त्यामुळे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. मंडलाधिकारी नागठाणे व सर्व तलाठ्यांना दाखले देण्यासंदर्भात सूचना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपजिल्हाध्यक्ष सतीश वाघमारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता ढेकळे, सातारा तालुका अध्यक्ष महिलावडे आशा भाऊ पाटील सातारा तालुका अध्यक्ष सयाजी कांबळे, उमा काकडे, शुभांगी लादे, यशवंत बरगडे, व भीमराव जाधव या सदस्यांनी या उपोषणात सहभाग घेतला आहे





