सातारा – सावित्रीबाईंवर दुग्धाभिषेकप्रकरणी निषेधकर्त्यांकडून दिलगिरी व्यक्त

खंडाळा – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिवशी दुग्धाभिषेक करुन निषेध व्यक्त करण्याचा प्रकार घडला होता. या पाठीमागे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अनादर दाखवण्याची कोणतीही भावना नव्हती. मात्र यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशा भावना व्यक्त करत राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) दत्तात्रय उर्फ बंडू ढमाळ, युवराज ढमाळ व इतर तीन निषेधकर्त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात गेल्या सात-आठ महिन्यात जातीय तेढ निर्माण होऊन आपापसात मतभेद करणारे वातावरण चालू आहे. महाराष्ट्राला समाज सुधारकांची थोर परंपरा आहे. महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्व समाजाला शिक्षणाची दारे खुली करून आपण सर्व एक आहोत ही सद्भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण केली आहे. या थोर नेत्यांचा आदर्श नेहमीच आपणा सर्वांच्या समोर असतो. मी व माझ्या मित्रांकडून दुग्धाभिषेक केला गेला.
मात्र, या अनादर करण्याची कोणतीही भावना नव्हती. यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही सर्वजण ओबीसी समाज बांधव, नायगाव ग्रामस्थ, नायगाव ग्रामपंचायत, मंत्री छगन भुजबळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.





