Satara Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ‘क्रेटा’ कारच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
Satara Accident : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जोशी विहीरनजीक ह्युंदाई क्रेटा कारने ठोकरल्याने वडगाव शेरी (पुणे) येथील विशाल वाघोले यांचा जागीच मृत्यू.

Satara Accident – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जोशी विहीरनजीक हॉटेल रायगड इन समोर भरधाव ह्युंदाई क्रेटा कार (एमएच-09-ईजे-9810 ने ठोकरल्याने विशाल गुलाब वाघोले (वय 50, रा. वडगाव शेरी, ता. हवेली, जि. पुणे) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवारी (दि. 7) रात्री 8 च्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विशाल वाघोले हे रविवारी (दि. 7) रात्री 8 च्या सुमारास पुणे बाजूकडे जाणार्या लेनवर रस्ता ओलांडत होते.
त्यावेळी पुणे बाजूकडे निघालेल्या ह्युंदाई क्रेटा कारने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात विशाल वाघोले यांचा जागीच मृत्यू झाला. कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शिवाजीराव तोडरमल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या कारचा शोध लावला.
त्यानंतर भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी केल्यानंतर वाघोले यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत अपघातग्रस्त व्यक्ती रस्त्यावर पडून असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सपोनि पृथ्वीराज ताटे व पोलिसांना काही वेळ प्रवशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. याप्रकरणी शिवाजीराव तोडरमल तपास करत आहेत.
खाकी वर्दीतील माणुसकी
एखाद्या अपघातानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांचा शोध घेऊन, त्यांना माहिती कळविण्यापासून मृतावर अंत्यसंस्कार होईपर्यंत मदत करणार्या शिवाजीराव तोडरमल यांचे भुईंज हद्दीत नाव आहे. त्यांनी आजपर्यंत खाकी वर्दीतील माणुसकी जपली आहे.





