प्रभात वृत्तसेवा सातारा – धोकादायक वळण आणि अरुंद रस्त्यामुळे ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात भोसे, ता. कोरेगाव येथील माजी सैनिक जागीच ठार झाले आहेेत. ही घटना ब्रिटीशकालीन संगम माहुली पूल, सातारा येथे रविवार, दि. ७ रोजी दुपारी सव्वातीन वाजता घडली. या घटनेनंतर ट्रकचालक अक्षय यलमर (वय ३0 रा. पिंपरी ता. खटाव) याला पोलीस हवालदार जयवंत कराळे यांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सेवानिवृत्त माजी सैनिक वसंतराव आनंदाराव माने वय ६५ रा. भोसे ता. कोरेगाव हे सातारा येथे कामानिमित्त आले होते. साताऱ्यातुन पुन्हा ते भोसे, ता. कोरेगाव गावाकडे दुपारी (दुचाकी क्र. एमएच १२ एचडी 0४६१) निघाले होते. दरम्यान, संगम माहुली येथील पुलाच्या अलिकडील धोकादायक वळणावरुन जात असताना कोरेगाव बाजूकडून ट्रकचालक अक्षय यलमर (वय ३0, रा. पिंपरी, ता. खटाव) हे ट्रक (क्रमांक एमएच १२ एचडी 0४६१) घेवून भरधाव वेगात आले. धोकादायक वळण अन अरुंद रस्त्यामुळे वाहन नियंत्रण न करता आल्याने समोरासमोर ट्रक व दुचाकीची धडक झाली. या धडकेत माजी सैनिक वसंतराव माने हे जागेवरच कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतंर त्यांचा मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. ही घटना नातेवाईकांना समजताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह नातेवाईक यांनी ताब्यात घेतला. या गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सातारा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरु होती.