Satara : महापुरुषांचा अवमान करणार्यांबाबत कठोर कायदा करावा

सातारा : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वच महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारावे. ऐतिहासिक चित्रपटांच्या चित्रीकरणात ‘सिनेमॅटिक लिबर्टी’चे नियमन करण्यासाठी समिती स्थापन करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, आदी मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्या आहेत.
उदयनराजे यांनी अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेऊन, त्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांविषयी संपूर्ण देशात आणि जगात आदर आहे. त्यांचे कार्य राष्ट्रासाठी चिरंतन प्रेरणास्रोत आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांबाबत अवमानकारक शेरेबाजी आणि टिप्पण्या करणार्यांवर तातडीने कारवाई होण्यासाठी कठोर कायदा करावा.
छत्रपती शिवरायांचे जीवनकार्य जागतिक स्तरावर नेण्यासाठी, त्यांचे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत स्थापन करावे. त्यातून महाराजांच्या इतिहासाचे जतन होईल. महाराजांच्या इतिहासाबाबत राष्ट्रीय समिती स्थापन करावी. त्यांच्याशी संबंधित अप्रकाशित दस्तऐवज, चित्रे, शस्त्रास्त्रे आणि इतर ऐतिहासिक नोंदींचे संशोधन आणि संकलन करण्यात यावे, ऐतिहासिक कलाकृती, कागदपत्रे आणि चित्रे विविध आंतरराष्ट्रीय संग्रहालयांमधून देशात परत आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. ऐतिहासिक चित्रपटांबाबत ‘सिनेमॅटिक लिबर्टी’चे नियमन करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात यावी.
सेन्सॉर बोर्डाला मदत करण्यासाठी इतिहासकार, संशोधक आणि तज्ज्ञांचा समावेश या समितीत करावा. राष्ट्रीय व्यक्तिमत्वे, प्रतीकांचा अवमान करणार्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारांना सूचना जारी केल्या जाव्यात, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी सोमनाथ धुमाळ, अॅड. विनित पाटील उपस्थित होते.





