Satara : तासवडे एमआयडीसीत ६ कोटी ३५ लाखांचे कोकेन जप्त

यशवंतनगर : तासवडे (ता. कराड) येथील एमआयडीसी परिसरात तळबीड पोलिसांनी मोठी कारवाई करत सूर्यप्रभा फार्मकेम कंपनीतून ६ कोटी ३५ लाख रुपये किमतीचे १२७० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध अंमली औषध अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने तासवडे एमआयडीसीतील बेकायदा धंद्यांचा पर्दाफाश झाला आहे.
तळबीड पोलिसांना दि. २१ मे रोजी सायंकाळी ४.२५ वाजण्याच्या सुमारास तासवडे एमआयडीसीतील बी- ५६ ब्लॉकमधील सूर्यप्रभा फार्मकेम कंपनीत संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती मिळाली. या कंपनीत शेतीसाठी खते आणि औषधे तयार केली जातात, असा दावा केला जात होता. मात्र, पोलिसांना संशय बळावल्याने सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कंपनीत छापा टाकला.
तपासणीदरम्यान, कंपनीच्या कपाटात प्लॅस्टिकच्या चार पिशव्यांमध्ये पांढरा- पिवळसर रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ आढळला. संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी पदार्थ ताब्यात घेऊन तपासणी केली. प्राथमिक तपासात हा पदार्थ १२७० ग्रॅम कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. ज्याची बाजारातील किंमत ६ कोटी ३५ लाख रुपये आहे.
याप्रकरणी अमरसिंह जयवंत देशमुख (नांदगाव, ता. सातारा), समीर सुधाकर पडवळ (वृंदावन सिटी, मलकापूर, कराड), रमेश शंकर पाटील (मल्हारपेठ, ता. पाटण), जीवन चंद्रकांत चव्हाण (आवार्डे, ता. पाटण), विश्वनाथ शिपणकर (दौंड, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, हे कोकेन विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे साठवण्यात आले होते. सूर्यप्रभा फार्मकेम कंपनीत शेतीच्या औषधांचा बहाणा करून हे बेकायदा कृत्य सुरू होते. पोलिसांनी पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि त्यांच्या पथकाने कमालीची गोपनीयता पाळत ही कारवाई यशस्वी केली. या कारवाईमुळे तासवडे एमआयडीसीतील बेकायदा धंद्यांवर प्रकाश पडला आहे.





