Satara : कोपर्डे हवेलीत तरसाच्या हल्ल्यात 25 शेळ्यांचा मृत्यू

यशवंतनगर : कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील बेघर वस्तीलगत असलेल्या आमराई नावाच्या शिवारात तरसाच्या हल्ल्यात 25 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे बाळू श्रीपती चव्हाण तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 6) रात्री घडली.
वस्तीपासून जवळच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. कोपर्डे हवेली, वडोली निळेश्वर, पार्ले, बनवडी येथील ग्रामस्थांमध्ये शेतवस्तीतील जनावरांच्या संरक्षणाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तरसाच्या हल्ल्यात बाळू चव्हाण यांच्या 15 शेळ्या आणि दहा करडे ठार झाली.
वनपाल संतोष शिंदे, वनरक्षक सविता कुट्टे, वनरक्षक रोहन माने, वनमजूर शंकर शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी अर्चना राऊत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी नुकसानीचे पंचनामे केले. या पाहणीमध्ये हे ठसे तरसाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा हल्ला बिबट्याने केला नसून, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनपाल संतोष शिंदे यांनी केले आहे.
आम्ही शेतात केलेल्या पाहणीत आढळलेले वन्यप्राण्याचे ठसे प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचे नसून, तरसाचे आहेत. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, योग्य ती काळजी घ्यावी.
– सविता कुट्टे, वनरक्षक, ओगलेवाडी (अतिरिक्त कार्यभार)
ग्रामस्थांमधून हळहळ
बाळू चव्हाण यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळीपालनातून होत होता. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात सर्व शेळ्या मृत्युमुखी पडल्याने, चव्हाण यांचा उघडा पडलेला संसार पाहून ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.





