सातारा – जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायती होणार पेपरलेस

सातारा – राज्य शासनाने महा ई- ग्राम संगणक प्रणाली विकसित केली असून त्यासाठी जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतीची निवड केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायती आता पेपरलेस होणार आहेत. निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर दि. 2 ऑक्टोबर रोजी या ग्रामपंचायती पेपरलेस ग्रामपंचायती म्हणून जाहीर होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली.
निवड केलेल्या ग्रामपंचायतींत संगणक प्रणालीमध्ये ग्रामपंचायतीकडील 1 ते 33 नमुने संगणकीकृत करणे, स्वयंघोषणापत्रे व 1 ते 7 प्रकारचे दाखले देणे, मासिक प्रगती अहवाल, मुलभूत माहिती इत्यादी सुविधा प्रामुख्याने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संगणक प्रणालीचा वापर सर्व ग्रामपंचायतींमध्ये सुरू करायचा असून सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, केंद्र चालक, विस्तार अधिकारी पंचायत यांचे प्रशिक्षण त्या त्या तालुक्यात घेण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
वेळापत्रकानुसार कार्यवाही होण्यासाठी तालुकास्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेळापत्रकाप्रमाणे दिलेल्या कार्यक्रमाची जबाबदारी ग्रामपंचायतीचे केंद्रचालक, ग्रामसेवक व संबंधित विस्तार अधिकाऱ्यांची राहणार आहे, असे अर्चना वाघमळे यांनी सांगितले.
वर्ये, कुस बुद्रुक, शेंद्रे, वळसे, शिवाजीनगर, वेणेगाव, आरळे, कामथी त. सातारा, कळंबे, धावडशी (सर्व ता. सातारा), रूई, शिरंबे, वेळू, शिरढोण, वाठार किरोली, वाघोली, करंजखोप, आसनगाव, जाधववाडी, चिलेवाडी (ता. कोरेगाव), बनपुरी, धारपुडी, बुध, डाळमोडी, तरसवाडी, गुरसाळे, गोसाव्याचीवाडी, कातळगेवाडी, मांडवे, वरूड (ता. खटाव) बिजवडी, देवापूर, गोंदवले खुर्द, जाधववाडी, जांभुळणी, कुळकजाई, मोही, टाकेवाडी, सोकासन, पिंपरी (ता. माण), हिंगणगाव, मुंजवडी, फरांदवाडी, कोळकी, माझेरी, वडले, निंबळक, सालपे, ठाकुरकी, निंभोर (ता. फलटण), अंदोरी, आसवली, बोरी, खेड बु., लोणी, पळशी, पारगाव, शिंदेवाडी, सुखेड, शिवाजीनगर (ता. खंडाळा), आसरे, उडतारे, कवठे, वेलंग, अभेपुरी, भिवडी पु., विरमाडे, बलकवडी, वेळे, बोपर्डी (ता. वाई), पिंपळी,
रानगेघर, चोरांबे, महामुलकरवाडी, केसकरवाडी, पिंपरी त. मेढा, करंडी त. मेढा, भोगवली तर्फ कुडाळ, कावडी, कोलेवाडी (ता. जावळी), क्षेत्र महाबळेश्वर, मेटगुताड, माचुतर, खिंगर, गोडवली, मांघर, वाडा कुंभरोशी, उचाट, तायघाट, आमशी (ता. महाबळेश्वर), घोणशी, गोसावेवाडी, कुसूर, अंधारवाडी,बेलवाडी, पाडळी हेळगाव, शिवडे, हनुमानवाडी, वस्ती साकुर्डी, तुळसण (ता. कराड), नाडे, मान्याचीवाडी. कारवट, तळमावले, नाव, आवर्डे, निवडे पुनर्वसित, गमेवाडी, सांगवड, बाचोली (सर्व ता. पाटण) या ग्रामपंचायतींची महा ई -ग्राम संगणक प्रणालीसाठी राज्य सरकारकडून निवड झाल्याचे अर्चना वाघमळे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेस करण्यावर प्रशासनाचा भर राहिला आहे. ग्रामपंचायतीमध्ये महा ई ग्राम संगणक प्रणालीच्या कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. या उपक्रमामुळे पारदर्शकता वाढणार आहे.
– ज्ञानेश्वर खिलारी
(मुख्य कार्यकारी अधिकारी)





