Satara : श्रीराम कारखान्यावर प्रशासक मंडळ नियुक्त करावे

फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करताना त्यामध्ये त्रुटी ठेवून मोजक्या मतदारांचे मतदान घेऊन सत्ता अबाधित ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव निवडणूक प्रक्रिया स्थगित झाल्याने हाणून पाडण्यात यश आले असून आता संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक मंडळ नियुक्त करावे, असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रशासकाच्या माध्यमातून मतदारयादीची पुनर्रचना करताना मृत सभासदांचे वारस, अपूर्ण शेअर्स रक्कम असणारे वगैरे योग्य सभासदांचा समावेश करून तसेच ज्यांच्या नावावर ७/१२ नाही असे बोगस सभासद रद्द करून अद्ययावत मतदारयादी तयार करून सर्व पात्र सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन नंतरच संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. केवळ ८० लोकांना मतदारयादीत ठेवून १५ हजार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न जागरूक शेतकरी विश्वासराव भोसले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उभारलेल्या लढ्यात आता योग्य न्याय निश्चित मिळेल, असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. मतदारयादीवरील आक्षेपाबाबत विश्वासराव भोसले व ॲड. नरसिंह निकम यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे आता न्यायालयीन लढाईत सर्व स्पष्ट होईल.
वास्तविक २ वर्षांपूर्वी मृत सभासदांच्या वारसांना मतदारयादीत सामावून घेणे आवश्यक होते. मात्र, चेअरमन, संचालक मंडळ आणि त्यांच्या कर्त्याकरवित्या तीन बंधूंनी ही जबाबदारी पार न पाडल्याने मतदानापासून वंचित राहणाऱ्या मृत सभासदांच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली, असे रणजितसिंह यांनी सांगितले. नियमबाह्य पद्धतीने बोगस मतदारयाद्या तयार करून विशेष लोकांच्या फायद्यासाठी हजारो लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा चेअरमन व संचालक मंडळाचा प्रयत्न निवडणूक स्थगित झाल्याने उधळून लावला गेला आहे, असेत्यांनी स्पष्ट केले. कायद्याची लढाई सुरू ठेवून सभासदांना न्याय देण्याच्या या लढाईत आपण स्वतः, आ. सचिन पाटील आणि अन्य सर्व जण तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सुरवडी येथे प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व आपण सर्वजण एकत्र बसलो त्यावेळी श्रीरामची निवडणूक ताकदीने लढवून जिंकण्याचा निर्णय झाल्याची आठवण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करुन देत राज्य सरकार आपल्यासोबत असल्याची ग्वाही दिली.





