सासवड: साखरपुडा समारंभात राडा; शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षावर पिस्तूल रोखून धमकी दिल्याचा आरोप, घटनेने खळबळ

Pune News : पुणे जिल्ह्यातील सासवड येथून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाने एका लग्न सोहळ्यात आपल्याच पुतण्या आणि पुतणीवर पिस्टल रोखून धमकावल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव हे आमदार विजय शिवतारे यांचे चुलत मुव्हणे आहेत. या प्रकरणी केतकी धनंजय झेंडे यांनी फिर्याद दिली असून त्या शिवतारे यांच्या सख्या भाजी आहेत.
नेमकी घटना काय?
सासवड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी सासवड-हडपसर रोडवरील महाराजा लॅान्समध्ये फिर्यादी झेंडे यांचे चुलत भावाचा साखरपुडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केतकी झेंडे या सहकुटुंब उपस्थित होत्या. तर या कार्यक्रमात विनय यादव, दिलीप यादव हे देखील उपस्थित होते.
यावेळी केतकी झेंडे यांचे चुलत भाऊ चिनू उर्फ संकेत यादव हा झेंडे याच्या परिवारातील सदस्यांना ‘तुम्ही शनिवारी माझ्या लग्नाला दिलीप यादव यांचे कारण देऊन आला नाहीत. मग आज या साखरपुड्यात कार्यक्रमाला कसे काय आले?’ असा प्रश्न केला. यावरून झेंडे यांचे दोन्ही भाऊ आणि चुलत भाऊ यांची चिनू यादव यांच्याशी किरकोळ बाचाबाची झाली.





