Saswad News – लोकप्रतिनिधींच्या सक्षम नेतृत्वामुळे गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल. लोकाभिमुख निर्णय, पारदर्शक कारभार आणि समन्वयातून विकास साधणे हीच काळाची गरज असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे यांनी व्यक्त केले. सासवड (ता. पुरंदर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात सासवड नगरपालिका, जेजुरी नगरपालिका, पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. त्यावेळी कामठे बोलत होते. लोकांच्या विश्वासाला पात्र ठरून निवडून आलेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन करीत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करीत विकासकामांना गती देऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य कराल, असा विश्वास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना उज्ज्वल व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत लोकसेवेच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, बाळासाहेब भिंताडे, जिल्हा परिषद सदस्या रूपाली अमोल झेंडे, डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, पंचायत समिती सदस्य अमित झेंडे, अर्चना कटके, मोनिका कांबळे, स्मिता निगडे, अरुण जगताप, वामन जगताप, सर्व नगरसेवक, साखर कारखान्यांचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.