प्रभात वृत्तसेवा सासवड – “सासवड शहर आधुनिक, सुव्यवस्थित आणि सर्व सुविधांनी युक्त करण्याचे स्वप्न आपण सर्वांनी पाहिले आहे. सासवडला स्मार्ट सिटीसारखे विकसित करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी स्वतः गळ घालणार आहे. सासवडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे.”असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक प्रचार सभेत केले. सासवड (ता पुरंदर) येथे प्रचार सभेनिमित्त चव्हाण बोलत होते. ते चव्हाण म्हणाले, “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची धडाडी दिसून येते. भाजप जनसेवा आणि पारदर्शक प्रशासन याचे व्रत घेऊन काम करत आहे. काही जण निवडणुकीच्या काळात खोटी आश्वासने देतील, पण भाजप विकासाच्या कामावर विश्वास ठेवतो. नागरिकांना विक्रमी मताधिक्याने सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. “सासवडचा सर्वांगीण विकास, झोपडपट्टीमुक्त शहर आणि आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी हे आपले उद्दिष्ट आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वर्गीय कै. चंदूकाका जगताप यांच्या विचारांना अनुसरून एकजुटीने उभे राहिले पाहिजे,” असे आवाहन माजी आमदार संजय जगताप यांनी निवडणूक प्रचार सभेत केले. जगताप म्हणाले की, “चंदूकाकांनी सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर काम केले. त्यांच्या विचारांवर आधार घेऊन आपण प्रत्येक प्रभागातून आपला नगरसेवक निवडून द्यावा., “सासवड नगरपरिषद देशातील सर्वाधिक स्वच्छ नगरपरिषद ठरली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी अनेक मोठ्या योजना मंजूर केल्या आहेत.”जगताप यांनी सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी सासवडसाठी 142 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली असून पिंपळे आणि वाघडोंगर येथे प्रत्येकी दोन कोटी लिटर क्षमतेचे साठवण तलाव उभारले जातील.” गॅस, पाणी व गटार या तिन्ही लाईनी भूमिगत टाकण्याचा रस्त्यांच्या दुरुस्तीचा डीपीआरही अंतिम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एक वर्षापासून जेजुरी आणि सासवडच्या पाणी प्रकल्पांसाठी वर्क ऑर्डर दिली गेली नाही, तसेच मागील काही महिन्यांत काहींच्या निष्क्रियतेमुळे शहराचे नियोजन बिघडल्याचा आरोपही त्यांनी केला. “अनेक अधिकारी आणि महापौरांनी सासवडला भेट देत प्रगतीची पाहणी केली आहे. आपल्याला जलद गतिने कामे पूर्ण करायची आहेत,” असे ते म्हणाले. सभेत बोलताना आमदार योगेश टिळेकर म्हणाले, “स्व. चंदूकाकांनी विकसित सासवडचे स्वप्न पाहिले. शहराची परंपरा दीडशे वर्षांची असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी संजय जगताप भाजपमध्ये आले.” मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीक्षेत्र आरणला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित केले, दोनशे कोटींचा विकास आराखडा मंजूर केला आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याचा ऐतिहासिक ठराव मांडला. तसेच लाडकी बहीण योजना राबवून महिलांसाठी महत्त्वाचे कार्य केले.सभेला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी भाजपाचे निरीक्षक राजेश पांडे, आमदार विक्रांत पाटील, आमदार माजी आमदार अशोक टेकवडे, मार्तंड भोंडे, दौलत शितोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.