ससून ड्रग्ज प्रकरण: ‘जे आहे ते सांभाळता आले नाही’; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाची तीव्र शब्दांत नाराजी

पुणे – “एखादं किरकोळ दुकान उघडलं तरी पोलिसांना कळतं. जे आहे ते सांभाळता आले नाही, आता 14 दिवसांची पोलीस कोठडी कशाला?’ असे म्हणत ललित पाटील पलायनप्रकरणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, “ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक विलास बलकवडे ऊर्फ जर्मन हे मेफेड्रॉन या अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यात वास्तव्यास होते.देशभरातील अनेकांच्या ते संपर्कात होते,’ अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाने न्यायालयास दिली. बुधवारी (दि.11) दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ससून रुग्णालयातील कॅन्टिनमधील कामगारामार्फत पुरविण्यात येत असलेला तब्बल 2 कोटी 14 लाख रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. त्याचा पुरवठा करण्यापूर्वी भूषण आणि अभिषेक यांनी ललितचा साथीदार सुभाष मंडल याला अमली पदार्थाचा नमुना दिला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तपासात मिळाले आहे. त्यामुळे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची साखळी निष्पन्न झाली आहे. “आरोपींचे मेफेड्रॉन उत्पादन, विपणन आणि विक्रीचे मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत तपास करण्यात येत आहे,’ असे पोलिसांनी न्यायालयास सांगितले.
या दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर भागातून अटक केली आहे. त्यांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी “मेफेड्रॉन तयार करण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल आरोपींना कोण पुरवत होते, याचा तपास करायचा आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली वाहने देखील जप्त करायची आहेत. त्यामुळे सखोल तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी द्यावी,’ अशी मागणी सहायक सरकारी वकील नीलम यादव-इथापे यांनी केली. तर, दोघांना पुणे जिल्हा विधी सेवातर्फे मोफत वकील देण्यात आले आहेत. दोघांतर्फे ऍड. यशपाल पुरोहित आणि ऍड. चैतन्य दीक्षित यांनी न्यायालयात बाजू मांडली.
- भूषण पाटील, अभिषेक बलकवडेला
- सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
- मेफेड्रॉनची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकांच्या संपर्कात





