पिंपरी | गोडुंब्रे ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र !

वडगाव मावळ (प्रतिनिधी) – गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच निशा गणेश सावंत यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्य पद रद्द केल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे. मंगळवार (दि.१० सप्टेंबर) त्यांनी हा आदेश दिला.
याबाबत शुक्रवारी (दि.११) अर्जदार आणि जाब देणार यांना आदेशपत्र देण्यात आले. गोडुंब्रे येथील लोकनियुक्त सरपंच निशा सावंत यांच्या निवडीनंतर त्यांच्या सदस्यत्व आणि सरपंच पदाला आव्हान देण्यात आले होते.
गोडुंब्रे येथील अर्जदार कल्पना हेमंत सावंत यांनी लोकनियुक्त सरपंच निशा गणेश सावंत यांच्या विरोधात १० जानेवारी २०२३ रोजी अर्ज केला होता.
अर्जात, ग्रामपंचायत गोडुंब्रे येथील लोकनियुक्त सरपंच निशा गणेश सावंत यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४(१) (ज-३) अन्वये अपात्र करण्याची मागणी करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर विवाद अर्जाच्या अनुषंगाने सविस्तर सुनावणी पार पडली. यात सर्व संबंधितांना नोटीसा काढून सुनावणी निश्चित करुन अर्जदार व जाब देणार यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेशी संधी उपलब्ध करून देण्यात आली.
त्यानंतर सदरहू विवाद अर्जाबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १६ (२) अन्वये जिल्हाधिकारी पुणे यांनी मंगळवार, दि.१९ सप्टेंबर २०२४ रोजी आदेश दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालपत्रातील आदेशात, जाब देणार निशा गणेश सावंत यांना ग्रामपंचायत गोडुंब्रे (ता. मावळ) येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदी राहण्यास अपात्र ठरविण्यात आल्याचे म्हटले आहे.
हा आदेश तहसीलदार मावळ, गटविकास अधिकारी मावळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आणि ग्रामसेवक गोडुंब्रे यांना पाठविण्यात आला आहे.
दरम्यान या आदेशाची माहिती प्राप्त झाल्यानंतर सरपंच निशा गणेश सावंत यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
ग्रामपंचायत सदस्याचे अतिक्रमण आणि नियम
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीच्या सदस्याने शासकीय जमिनीवर किंवा मालमत्तेवर अतिक्रमण केले असल्यास अशा व्यक्तीस त्याच्या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते.
ग्रामपंचायत अधिनियम कायदा, ग्रामविकास मंत्रालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या अतिक्रमणाबाबत काही निर्णय निर्गमित केले आहेत.
त्यानुसार, ग्रामपंचायत क्षेत्रातील सरकारी जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करणारा ग्रामपंचायत सदस्य हा सदस्य पदासाठी अपात्र ठरतो.
ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबातील व्यक्तीने जरी अतिक्रमण केले किंवा कुटुंबीय अतिक्रमण केलेल्या जागेत राहत असेल तर असा कोणताही व्यक्ती ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी अपात्र असतो.
ग्रामपंचायत सदस्य किंवा त्याच्या कुटुंबियांनी केलेले अतिक्रमण हे सदस्य पद धारण करण्यापूर्वी किंवा सदस्यत्व असणाऱ्या काळातील असेल तरीही असा व्यक्ती सदस्य पदासाठी अपात्र ठरतो. महिला सदस्याच्या विवाहपूर्वी झालेले अतिक्रमण देखील ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र ठरवितात.





