Sarfaraz Khan : सर्फराझ खानचा धमाका! शतक झळकावत ठोकली पुनरागमनाची दावेदारी

Sarfaraz Khan hits century : भारताचा युवा फलंदाज सर्फराझ खान सातत्याने स्वतःला सिद्ध करत आहे. अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करत राष्ट्रीय संघात निवडीसाठी जोरदार दावेदारी सादर केली आहे. सोमवारी चेन्नईत बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना सर्फराझने तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन विरुद्ध शानदार शतक झळकावले.
धडाकेबाज शतक झळकावत साकारली महत्त्वपूर्ण भागीदारी –
मुंबईकडून नंबर ५ वर फलंदाजीसाठी उतरलेल्या सर्फराझने अवघ्या ९२ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने आकाश पारकरसह सहाव्या गड्यासाठी १०० हून अधिक धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात सर्फराझला हॅमस्ट्रिंगचा त्रास होऊ लागल्याने ११४ चेंडूंमध्ये १३८ धावांवर तो रिटायर्ड हर्ट झाला. सर्फराझ सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने मेहनत घेत आहे आणि त्याच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वजन कमी करून उत्कृष्ट फॉर्ममध्ये –
Sarfaraz Khan comes up with a magnificent Hundred in the opening match of the Buchi Babu Tournament for Mumbai 💥🏏
📸: TNCA/ YouTube #SarfarazKhan #MCA #BuchiBabuTrophy #Indiancricket #Insidesport #CricketTwitter pic.twitter.com/FGllYmbs53
— InsideSport (@InsideSportIND) August 18, 2025
सर्फराझने आपले वजनही लक्षणीयरीत्या कमी केले असून, तो सध्या आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शारीरिक स्थितीत आहे. यंदाच्या सुरुवातीला भारत ‘अ’ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील मालिकेसाठी त्याने यूके दौरा केला होता. त्या दौऱ्यातील पहिल्या अनौपचारिक कसोटीत त्याने पहिल्या डावात ९२ धावा केल्या. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी त्याला संघातून वगळण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी करुण नायर आणि साई सुदर्शन यांना नंबर ३ वर संधी देण्यात आली, पण दोघांनाही ही जागा पक्की करता आली नाही. त्यामुळे आगामी काळात सर्फराझला पुन्हा संघात स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
हेही वाचा – Irfan Pathan : धोनीमुळं माझं करिअर संपलं…? इरफान पठाणचा धक्कादायक खुलासा; जाणून घ्या काय म्हणाला?
न्यूझीलंडविरुद्ध शानदार १५०, पण पुढील डावांत निराशा* –
सर्फराझने अखेरचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या दौऱ्यादरम्यान खेळला. बंगळुरू येथील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शानदार १५० धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतरच्या चार डावांत त्याला केवळ २१ धावा करता आल्या आणि भारताला ०-३ अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही सर्फराझने देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीने राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले आहे.
आगामी दौऱ्यात भारतीय संघात मिळू शकते संधी –
भारत आगामी हंगामात मायदेशात वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. करुण नायर आणि साई सुदर्शन यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे सर्फराझला मधल्या फळीतील स्थान पक्के करण्याची मोठी संधी आहे. त्याचा सध्याचा फॉर्म आणि मेहनत पाहता, तो लवकरच भारतीय कसोटी संघात पुनरागमन करेल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे.





