महायुतीतील मंत्र्याने वाटलेल्या साड्यांची गावकऱ्यांकडून भर चौकात होळी

छ. संभाजीनगर – नवरात्र आणि दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मंत्र्याने वाटप केलेल्या साड्यांची गावकऱ्यांनी भर चौकात होळी केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहीणींना साड्या, ड्रेस व नऊवार पातळांचे वाटप केले होते.
मतदारसंघातील उंडणगाव येथे अब्दुल सत्तार मित्र मंडळाकडून वाटप करण्यात आलेल्या साड्यांची गावातील मुख्य चौकात होळी करण्यात आली. यावेळी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. याआधी 6 आॅक्टोबर रोजी सर्वप्रथम वांगी (बुद्रक) गावात साड्यांची होळी करण्यात आली होती. त्यानंतर हे लोण मतदारसंघातील इतर गावांमध्ये हळूहळू पसरले. आज उंडणगाव येथे होळी करण्यात आली.
हे विरोधकांचे षडयंत्र आहे, असा आरोप अब्दुल सत्तार मित्र मंडळाकडून करण्यात आला आहे.





