मंत्रिपदांच्या जागांसाठी इच्छुक जास्त..! मंत्री अब्दुल सत्तारांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाब स्पष्टचं सांगितलं

सोलापूर – मंत्रिमंडळात सध्या राज्यमंत्रीच नसल्याने अधिवेशन काळात दोन्ही सभागृहात हजर राहणे अडचणीचे झाले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार गरजेचा असला तरी मंत्रिपदाच्या केवळ 13 जागा उरल्या असताना इच्छुकांची संख्या जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याची कबुली पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
पंढरपूर येथे सत्तार रविवारी त्यांच्या मतदारसंघातील वारकऱ्यांच्या गाथा पारायण कार्यक्रमासाठी आले असता बोलत होते. सत्तार म्हणाले, गेल्या साडेतीन महिन्यांपासून आपण माध्यमांपासून दूर राहिलो होतो. आज देवाच्या दारात बोलतो, असे म्हणत त्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली.सध्या सरकारला पाठिंबा देणारे 210 आमदार असल्याने नाराजीचा प्रश्न येत नाही. मात्र, विस्तारात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या कोट्यातील योग्य व्यक्तीला मंत्रिपद देतील, असे सांगत विस्तारास कोणीही नाराज नसल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ए प्लॅन सगळ्यांना दिसतो. मात्र, त्यांचा बी प्लॅन देखील तयार असतो आणि तो कधीच फेल जात नाही. तसेच आमच्या 50 आमदारांसोबत अजून 25 आमदार निवडून आणायची ताकद मुख्यमंत्री शिंदेंमध्ये असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मी पुन्हा येईन!
यंदा सिल्लोड मतदारसंघातून गेल्यावेळी पेक्षा चारपट जास्त फरकाने विजयी होऊ, असे सत्तारांनी सांगत त्यांच्या विजयाचे गणितही सांगितले. सिल्लोड मतदारसंघात 3 लाख 20 हजार हिंदू आणि केवळ 60 हजार मुस्लिम असूनही आपण कायमच मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतो. याचे कारण फक्त जनतेचा मिळवलेला विश्वास असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्याच जोरावर मी पुन्हा येईन, असेही मिश्किल पद्धतीने सत्तारांनी सांगितले.





