विनाअनुदानित शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करावे
Updated On:

पुणे : राज्यातील विनाअनुदानीत व खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे विशेष करोना ना परतावा सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याचे उपाध्यक्ष शिवाजी शेंडगे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांच्याकडे केली आहे.
राज्य शासनाने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन इयत्ता पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता वर्गोन्नतीचे निकाल बनवण्याचे काम शिक्षक करीत आहेत. या करोना काळात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व विद्यार्थी, शिक्षकांना दिलासा देण्यासाठी शाळांना सुट्टी जाहीर करावी व वर्गोन्नतीचे निकाल जून मध्ये जमा करण्याची मुभा द्यावी. तसेच शासनाचे स्पष्ट निर्देश नसल्याकारणाने काही ठिकाणी ऑनलाइन लेक्चर अजुनही सुरूच आहेत ते त्वरित थांबवण्याचे निर्देश द्यावेत.
महाराष्ट्रात ज्या शिक्षकांना कोरना ड्युटी लावण्यात आली आहे त्या सर्व शिक्षकांचे करोना विमा कवच कायम ठेवावे.
शिक्षक व शिक्षकेत्तरांचे पगार दर महिन्याच्या एक तारखेला नियमितपणे व्हावेत. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेत्तरांचे पगार अजूनही झालेले नाही. त्यासाठी पगार सुप्रीडेंटच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. तरी पूर्वीप्रमाणेच शिक्षण अधिकाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करण्याचे आदेश नव्याने काढावेत व मार्च पेड एप्रिल चा पगार त्वरित शिक्षक, शिक्षकेत्तरांच्या खात्यात जमा करावा. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेत करावे
महाराष्ट्रातील विनाअनुदानित, खासगी इंग्रजी माध्यमातील शाळांच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना करोनामुळे शाळांकडून पगार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना करोनाबरोबरच आर्थिक संकटाचाही सामना करावा लागतो आहे. सानुग्रह अनुदान मिळाल्यास या करोना काळात त्यांचा उदरनिर्वाह चालेल, असे शेंडगे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच निवेदनाचा ईमेल प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे.





