पुणे | झेडपी सीईओचा पदभार संतोष पाटील यांनी स्वीकारला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे जिल्हा परिषदेत आरोग्य व शिक्षण या खात्यास अधिक प्राधान्य राहणार आहे. त्याचप्रमाणे आर्थिक वर्षअखेरीस सर्व निधी खर्ची करणे आवश्यक आहे. कोणतीही निधी कामाअभावी परत जाता कामा नये, हे मोठे आव्हान आहे, अशी माहिती नवनियुक्त झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे सीईओ रमेश चव्हाण यांची बदली झाली. त्याठिकाणी कोल्हापूर झेडपीचे सीईओ संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार पाटील यांनी चव्हाण यांच्याकडून पदभार स्वीकारला. सीईओ पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळस्थिती असून पाणी टंचाईचे संकट आहे. जवळपास ५९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच जनावारांचा चाऱ्यासाठी त्वरित पाऊले उचलले जातील.
शासनाच्या योजना व निधी सर्वसामान्यांपर्यंत पोहचला पाहिजे आणि गरजूंना त्याचा लाभ मिळण्याचा प्रयत्न राहील, असे संतोष पाटील यांनी सांगितले. विशेषत: शिक्षण व आरोग्य याकडे अधिक लक्ष दिले जाईल. त्याचप्रमाणे खानवडी येथील मुलींची शाळा व वसतिगृह उभारण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.




