‘वाल्मिक कराडवरही मकोका लावा’, संतोष देशमुख यांच्या भावाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडलाही आरोपी करावे व त्याच्यावर मकोका लावावा, अशी मागणी केली जात आहे. याप्रकरणी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्यासोबतच गावातील इतर नागरिक देखील आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मस्साजोग गावात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
आतापर्यंत या प्रकरणात 8 आरोपींना पकडण्यात आले आहे. तर एक आरोपी फरार आहे. या हत्या प्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला नाही. त्यामुळे धनंजय देशमुख व मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले होते की, ‘आरोपीला मकोका आणि 302 आरोपामध्ये नाही घेतलं तर माझे कुटुंब मोबाईल टॉवर चढून आंदोलन करणार आहे. मोबाइल टॉवरवर मी स्वत:ला संपून घेतो.’
हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे. या आरोपींना सोडले तर हे माझा खून करतील. माझ्या कुटुंबात न्याय मागणारे कोणी नसेल, अशी भीती देखील धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली होती. ‘आरोपीला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जर या आरोपीला मकोका आणि ३०२ आरोपामध्ये नाही घेतले तर मोबाईल टॉवरवर छडून आंदोलन करेल’, असा इशारा त्यांनी यापूर्वी दिला होता.
‘हे आरोपी सोडले तर माझा हे खून करतील. माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल. माझ्या भावालाही वाटेल की, आपला भाऊ स्वत: संपला. त्यालाही समाधान वाटेल की अशा पद्धतीने मारला गेला नाही’, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.





